Russia Earthquake News: भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरलं रशिया, त्सुनामीचा धोका अन् हायअलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रशियाच्या कमचटका प्रदेशात 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून प्रशांत महासागर किनाऱ्यालगत त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी रशिया हादरलं आहे. 7.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. रशियाच्या कमचटका प्रदेशाच्या किनाऱ्यापासून दूर शनिवारी पहाटे भूकंपाचे मोठे धक्के बसले. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल नोंदवली. समुद्राच्या खोलीत केंद्रबिंदू असलेल्या या धक्क्यांमुळे परिसरातील किनारी भागात लोकांना तीव्र हादरे जाणवले.
जुलै महिन्यात याच भागात 8.8 तीव्रतेचा महाभूकंप झाला होता आणि त्या वेळी प्रशांत महासागराच्या अनेक भागांत सुनामीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे ताज्या भूकंपाने स्थानिकांमध्ये भीती आणि चिंता आणखीनच वाढली आहे. प्रशांत सुनामी चेतावनी केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा परिणाम समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये जास्त होऊ शकतो. प्राथमिक अंदाजानुसार, प्रशांत महासागराच्या जवळ असलेल्या देशांना सुनामीचा धोका आहे.
advertisement
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, हादरे जाणवताच नागरिक घाबरून घराबाहेर पडले. प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परिस्थितीवर बारीक नजर ठेवली असून दर तासाला अद्ययावत माहिती देण्याची घोषणा केली आहे.
कमचटका हा प्रदेश ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’मध्ये मोडतो, जो ज्वालामुखी उद्रेक आणि भूकंपासाठी ओळखला जातो. इथे लहानमोठे झटके कायम येत असतात. मात्र 7.4 इतक्या तीव्रतेचा भूकंप धोकादायक मानला जात आहे. यामुळे मोठी त्सुनामी येऊ शकते आणि त्यामुळे नुकसान होऊ शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 9:33 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Russia Earthquake News: भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरलं रशिया, त्सुनामीचा धोका अन् हायअलर्ट