कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, बोंड अळीचा धोका वाढला, कशी घ्यावी काळजी?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Cotton Cultivation: मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. कापसाच्या शेतीला बोंडअळीनं विळखा घातला असून त्याबाबत योग्य काळजी घेण्याची गरज आहे.
बीड: मराठवाड्यात सध्या कापूस वेचणीची घाई चालू आहे. अशातच वातावरणातील बदलांमुळे बीडमधील कापूस उत्पदाकांना पुन्हा संकटाला सामोरं जावं लागणार आहे. कापसाच्या शेतीला बोंडअळीनं विळखा घातलाय. काही ठिकाणी कापूस वेचणीची पहिली फेर झाली आहे तर काही ठिकाणी दुसरी फेर चालू आहे. अशातच कापसाच्या बोंडांवरती मोठ्या प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव झालेला आहे. बोंडाच्या आतल्या भागामध्ये अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बोंडाची नासाडी होत असून शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कापूस क्षेत्र जास्त असून बोंडआळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामध्ये 3 तालुक्यांत बोंडअळीचा धोका जास्त आहे. माजलगाव, केज आणि वडवणी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोंडावर अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
advertisement
काय घ्यावी काळजी?
मराठवड्यामध्ये या वर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्प्याटप्प्याने झालेली आहे. त्यामुळे बोंड अळीला सतत खाद्य उपलब्ध होत आहे. परिणामी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सद्यःस्थिती पाहता वातावरणीय बदलामुळे कपाशीच्या पिकांवर गुलाबी बोंड अळीचे पतंग सक्रिय झालेले आढळून येत आहेत. मादी पतंग पाते, बोंडे यावर अंडी घालतात. या अळीच्या प्रादुर्भावाची निरीक्षणासाठी प्रतिहेक्टरी 5 कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंचीवर लावावेत, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.
advertisement
कापूस 40 ते 45 दिवसाचा झाल्यावर एकरी दोन याप्रमाणे कामगंध सापळे उभारण्यात यावेत. सापळ्यात अडकलेल्या पतंगाची संख्या आठवड्यातून एकदा मोजणे गरजेचे आहे. पतंगाची संख्या अधिक असेल तर शिफारस करुन दिल्याप्रमाणे किटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. डोमकळ्या दिसताच शेतकऱ्यांनी त्या खोडून टाकणे आवश्यक आहे. कापसाच्या बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही बोंडांची पाहणी करुन त्या हिरव्या बोंडावर जर किडीचा प्रादुर्भाव असेल तर ती बोंडे ही काढून टाकणे हाच पर्याय शेकऱ्यांसमोर राहणार आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
November 12, 2024 10:54 AM IST