शिक्षण घेतलं पण नोकरी टाळली, एका निर्णयाने आयुष्य बदललं, अनुष्का आता वर्षाला करतेय 1 कोटींची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : स्वप्ने मोठी असली की मार्ग आपोआप बदलतात. सुरक्षित, ठराविक वाटेऐवजी काही जण आव्हानांनी भरलेला रस्ता निवडतात आणि त्याच ठिकाणी इतिहास घडतो.
मुंबई : स्वप्ने मोठी असली की मार्ग आपोआप बदलतात. सुरक्षित, ठराविक वाटेऐवजी काही जण आव्हानांनी भरलेला रस्ता निवडतात आणि त्याच ठिकाणी इतिहास घडतो. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील अनुष्का जयस्वाल हिची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे. उत्तम शिक्षण, प्रतिष्ठित कॉलेज आणि चांगल्या नोकरीच्या संधी असूनही तिने वेगळा विचार केला. नोकरीच्या ऑफर्स नाकारत तिने मातीशी नातं जोडण्याचा निर्णय घेतला आणि आज ती शेतीतून दरवर्षी कोट्यवधींचा व्यवसाय उभारणारी यशस्वी उद्योजिका ठरली आहे.
advertisement
चांगली ऑफर मिळूनही नोकरीचा त्याग केला
2017 साली दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अनुष्का प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी झाली होती. चांगली नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तिला मिळालेल्या कोणत्याही ऑफरने तिचे मन भरले नाही. कारण तिचे स्वप्न वेगळे होते. तिला फक्त नोकरी नाही, तर समाजाच्या तळागाळात काहीतरी ठोस बदल घडवायचा होता. सेंट स्टीफन कॉलेजमधून फ्रेंचचे शिक्षण घेतल्यानंतरही तिला समाधान मिळाले नाही. अखेर स्वतःच्या ध्येयांचा शोध घेत ती लखनौला परतली.
advertisement
घरच्या गच्चीवर काही टोमॅटोची रोपे लावणे हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. मातीशी काम करताना तिला वेगळाच आनंद मिळू लागला. रोपांची वाढ, फळधारणा आणि त्यातून मिळणारे समाधान याने तिला शेतीकडे ओढले. हाच छंद पुढे करिअरमध्ये रूपांतरित होऊ शकतो, याची जाणीव तिला झाली. एके संध्याकाळी चहा घेताना तिने आपल्या भावाशी मन मोकळे केले. भावाने तिच्या विचारांना पाठिंबा दिला आणि तिला पुढचा मार्ग निवडण्यासाठी धैर्य दिले.
advertisement
2020 मध्ये पॉलीहाऊस फार्म सुरू केला
यानंतर अनुष्काने नोएडा येथील फलोत्पादन तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश घेतला. फलोत्पादन, आधुनिक शेती पद्धती, बाजारव्यवस्था आणि संरक्षित शेती याविषयी तिने सखोल अभ्यास केला. विविध अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तिची आवड पॉलीहाऊस आणि नियंत्रित वातावरणातील शेतीकडे अधिक वाढत गेली. व्यापक संशोधनानंतर 2020 मध्ये तिने एक एकर जमिनीवर पॉलीहाऊस फार्म सुरू केला.
advertisement
अवघ्या 24 व्या वर्षी अर्थशास्त्राची पदवीधर असलेल्या अनुष्काने इंग्रजी काकड्यांपासून शेतीची सुरुवात केली. पहिल्याच हंगामात तिने तब्बल 51टन उत्पादन घेतले. पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत हे उत्पन्न जवळपास तिप्पट होते. या यशाने आत्मविश्वास वाढल्यानंतर तिने लाल आणि पिवळ्या शिमला मिरचीची लागवड सुरू केली. एका एकरातून 35 टन उत्पादन घेत तिने शिमला मिरची सरासरी 80 ते 100 रुपये किलो दराने विकली. आज ती दरवर्षी सुमारे 200 टन शिमला मिरचीचे उत्पादन करते.
advertisement
1 कोटींची कमाई
सध्या अनुष्का 6 एकरांहून अधिक क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने भाज्या पिकवते. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2023-24 या वर्षात तिची उलाढाल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. तिच्या शेतमालाची विक्री ब्लिंकिट, बिग बास्केटसारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर होतेच, शिवाय लुलू हायपरमार्केटसारख्या मोठ्या मॉल्समध्येही तिच्या भाज्यांना मागणी आहे. दिल्ली, वाराणसीसारख्या बाजारपेठांमध्येही तिचा माल पोहोचतो. विशेष म्हणजे तिच्या या प्रवासातून 25 ते 30 जणांना रोजगार मिळाला असून त्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. अनुष्काची कहाणी आजच्या तरुणांसाठी स्वप्न पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची खरी प्रेरणा ठरत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 7:13 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शिक्षण घेतलं पण नोकरी टाळली, एका निर्णयाने आयुष्य बदललं, अनुष्का आता वर्षाला करतेय 1 कोटींची कमाई









