Bail Pola 2025: दोन्ही डोळ्यांनी अंध बैल अन् शेतकऱ्याची अनोखी दोस्ती, Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Bail Pola 2025: बैलपोळा हा बळीराजा आणि बैल यांच्यातील नातं दर्शवणारा सण होय. सोलापुरातील शेतकरी आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या सोन्या बैल यांच्यातील मैत्री चर्चेचा विषय ठरतेय.
सोलापूर – शेतात राबराब राबणाऱ्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजेच बैलपोळा होय. कृषी संस्कृतीतील हा महत्त्वाचा सण बळीराजा आणि बैल यांचं अतूट नातं दर्शवणारा आहे. जे नातं माणसाला टिकवता येत नाही तेच नातं सोलापुरातील एका शेतकऱ्याने आपल्या अंध असणाऱ्या बैलासोबत जपलंय. तब्बल 18 वर्षांपासून शेतकरी इंद्रसेन मोटे हे आपल्या अंध असणाऱ्या बैलाचा सांभाळ करत आहेत. तर बैल देखील शेतात काम करतोय. आज बैल पोळा सणाच्या दिवशी शेतकरी इंद्रसेन मोटे व दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या सोन्या बैल यांच्याबाबत लोकल18 च्या माध्यमातून पाहणार आहोत.
मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावात राहणाऱ्या इंद्रसेन गोरख मोटे यांच्याकडे बारा एकर शेती आहे. इंद्रसेन यांचे वडील गोरख मोटे यांना खिलार बैलांची आवड आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित दोन खिलार बैल होते. खिलार बैलांचा नाद इंद्रसेन यांनाही लहानपणापासूनच लागला होता. त्यामुळे त्यांनी सातवीपर्यंत शाळा शिकली आणि शेती करण्यास सुरुवात केली. 2005 मध्ये घरच्या गाईच्या पोटी सोन्या बैलाचा जन्म झाला. तीन वर्षानंतर सोन्या बैल हाताला आला आणि 2010 मध्ये शेती कामात तो चांगला तयार झाला.
advertisement
शेतामध्ये काम करत असताना सोन्या बैलाच्या दोन्ही डोळ्यातून पाणी यायचं. तेव्हा इंद्रसेन यांनी गावातील पशुतज्ज्ञ डॉक्टर श्रीहरी शिंगारे यांना दाखवलं. डॉक्टरांनी डोळे तपासले आणि सांगितले की, तुमच्या सोन्या बैलाला दुर्धर आजार झाला असून त्याच्या डोळ्यात मांस वाढलेलं आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करून डोळे काढावे लागतील. हे ऐकल्यावर इंद्रसेन यांना धक्का बसला. पण त्यांनी सोन्याच्या प्रेमापोटी काहीही करा पण त्याला हा त्रास व्हायला नको, असे डॉक्टरांना सांगितले.
advertisement
सुरुवातीला शस्त्रक्रिया करून सोन्या बैलाचा एक डोळा काढण्यात आला. कालांतराने हा आजार दुसऱ्या डोळ्यालाही झाला तेव्हाही शस्त्रक्रिया करून डोळा काढण्यात आला. तेव्हा गावकऱ्यांनी बैल विकून दुसरा बैल घेण्याचा सल्ला दिला. परंतु, इंद्रसेन यांनी बैलाला न विकता त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आणि घरच्या गाईचा हा बैल ते 18 वर्षांपासून सांभाळत आहेत.
advertisement
दरम्यान, आज इंद्रसेन मोटेच नव्हे तर त्यांची पत्नी मनिषा मोटे, मुलगी सानिका, साक्षी व मुलगा शिवम यांनाही अंध बैल सोन्याचा लळा लागलेला असून घरच्या सदस्यासारखीच त्याची काळजी घेतात. नैसर्गिक रित्या त्याचं निधन झालं तरी शेतामध्येच त्याची समाधी करणार असल्याचं शेतकरी इंद्रसेन मोटे सांगतात.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
August 22, 2025 8:10 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Bail Pola 2025: दोन्ही डोळ्यांनी अंध बैल अन् शेतकऱ्याची अनोखी दोस्ती, Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!

