सौरउर्जेचा प्रकल्प घेत असाल तर सावधान! छ. संभाजीनगरात उद्योजकाला घातला २७ लाखांचा गंडा, फसवणूक कशी टाळाल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
सौरऊर्जा प्रकल्पाचे शासकीय कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका उद्योजकाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर : सौरऊर्जा प्रकल्पाचे शासकीय कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका उद्योजकाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गोव्यातील एका दाम्पत्यासह उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे २७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
advertisement
पडेगाव परिसरातील रहिवासी मुक्तार बुसूफ शेख (वय ५०) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. शेख हे ‘ग्लोबल व्हिजन इकोग्रीन इन्फ्राटेक प्रा. लि.’ या कंपनीच्या माध्यमातून शासकीय विद्युत कंत्राटदार म्हणून व्यवसाय करतात. मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्याच्या प्रयत्नात असताना त्यांची ही फसवणूक झाली.
advertisement
प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप राजकिशोर शाक्य (रा. गोवा), रश्मी अनुप शाक्य (रा. गोवा) आणि विक्रांतसिंग गंगारामसिंग कुशवाहा (रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. पुणे येथील एका मध्यस्थामार्फत मुक्तार शेख यांची आरोपींशी ओळख झाली. आरोपींनी स्वतःला ‘इलाइट जी. के. इन्फ्रा प्रा. लि.’ या नामांकित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून शेख यांचा विश्वास संपादन केला.
advertisement
आरोपींनी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे १० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवले. प्रति मेगावॅट ४ कोटी ५० लाख रुपये या दराने काम देण्याचे ठरवण्यात आले. प्रकल्पासाठी अनामत रक्कम म्हणून ४ लाख ७९ हजार रुपये तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार २० जून २०१४ रोजी शेख यांनी गोव्यातील एका बँकेत ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम जमा केली.
advertisement
त्यानंतर आरोपींनी प्रकल्पाची पाहणी दाखवण्याचे सांगत शेख यांना उदगीरऐवजी अकोला येथील दुसरीच साइट दाखवली. यामुळे शेख यांना संशय आला. वारंवार पाठपुरावा करूनही आरोपींनी कोणतीही अधिकृत वर्क ऑर्डर दिली नाही. पैशांची मागणी केल्यानंतर आरोपींनी परतफेडीचा दिखावा करत काही धनादेश दिले, मात्र ते धनादेश बँकेत सादर केल्यानंतर वटले नाहीत.
advertisement
अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करण्याची धमकी
फसवणूक उघडकीस आल्यानंतर आरोपींनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची, तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करण्याची धमकी देण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले. अखेर आरोपींनी १९ लाख २९ हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित २७ लाख ५० हजार रुपये देण्यासाठी टाळाटाळ सुरू ठेवली.
advertisement
या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आर्थिक व्यवहारांचे कागदपत्रे आणि बँक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. सौरऊर्जा प्रकल्पांच्या नावाखाली वाढणाऱ्या अशा फसवणूक प्रकरणांमुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने नागरिकांना अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 9:51 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
सौरउर्जेचा प्रकल्प घेत असाल तर सावधान! छ. संभाजीनगरात उद्योजकाला घातला २७ लाखांचा गंडा, फसवणूक कशी टाळाल?









