कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात का घसरले? बाजारभाव कधी वाढणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Onion Rate Issue : चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारताच्या कांदा निर्यातीसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत.
मुंबई : चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारताच्या कांदा निर्यातीसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. जागतिक बाजारपेठेतील बदलती मागणी, खरेदीदार देशांची धोरणे आणि वाढती स्पर्धा यामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीवर सातत्याने दबाव जाणवत आहे. निर्यातदारांच्या मते, हा दबाव तात्पुरता नसून जागतिक कांदा व्यापारातील संरचनात्मक बदलांचा परिणाम आहे.
पारंपारिक बाजारपेठांचा कल बदलतोय
भारतीय कांद्याचे मोठे खरेदीदार असलेले बांगलादेश आणि सौदी अरेबिया आता पर्यायी स्रोतांकडे वळले आहेत. बांगलादेशने देशांतर्गत उत्पादन वाढवल्याने आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. तर सौदी अरेबिया येमेन आणि सुदानसारख्या देशांकडून कांद्याची खरेदी वाढवत आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी पारंपारिक बाजारपेठांमध्ये संधी मर्यादित होत आहेत.
उत्पादन वाढल्याने आयातीची गरज घटली
बिझनेसलाइनच्या अहवालानुसार, हॉर्टिकल्चर एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शाह यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत अनेक देशांनी कांद्याचे उत्पादन लक्षणीय वाढवले आहे. परिणामी, हे देश आता आयातीऐवजी स्थानिक उत्पादनावर भर देत आहेत. याचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर होत आहे.
advertisement
पाकिस्तानी कांद्याशी तीव्र स्पर्धा
भारतीय कांदा निर्यातीसमोर पाकिस्तान हे मोठे आव्हान ठरत आहे. पाकिस्तानचे चलन कमजोर असल्याने तेथील कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त दरात उपलब्ध होतो. किमतींतील या फरकामुळे अनेक खरेदीदार भारतीय कांद्याऐवजी पाकिस्तानी कांद्याला पसंती देत आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय कांदा सरस असला तरी सध्याच्या बाजारात किंमत हा निर्णायक घटक ठरत आहे.
advertisement
निर्यात बंदीचे दीर्घकालीन परिणाम
निर्यातदारांच्या मते, दोन ते तीन वर्षांपूर्वी भारताने लादलेल्या निर्यात बंदीचा परिणाम आता अधिक स्पष्टपणे दिसून येतो आहे. त्या काळात अनेक खरेदीदारांनी पर्यायी पुरवठादार शोधले. पाकिस्तान, सुदान आणि येमेनसारख्या देशांनी या संधीचा फायदा घेत आपली उपस्थिती वाढवली. पूर्वी काही महिन्यांपुरती मर्यादित असलेली त्यांची निर्यात आता सहा ते नऊ महिन्यांपर्यंत सुरू आहे.
advertisement
मूल्य घटले, प्रमाण वाढले
अधिकृत आकडेवारीनुसार, DGCIS च्या माहितीनुसार एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत कांद्याच्या निर्यातीचे मूल्य सुमारे २२ टक्क्यांनी घटून २९८.६९ दशलक्ष डॉलर्सवर आले आहे. मात्र, याच काळात निर्यातीचे प्रमाण ३७ टक्क्यांनी वाढून १.१३३ दशलक्ष टन झाले आहे. यावरून आंतरराष्ट्रीय बाजारात किमतींवर मोठा दबाव असल्याचे स्पष्ट होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 1:27 PM IST








