हातात राहील पैसा, आंतरपीक पद्धती कशी फायदेशीर? प्रयोगशील शेतकऱ्याने सांगितला अनुभव, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
ऊस, हळद अशी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना 12 ते 18 महिन्यांतून एकदाच पैसे हातात येतात. परंतु शेतकऱ्यांच्या हातात टप्प्या-टप्प्याने पैसे येत राहणे गरजेचे असते.
सांगली: ऊस, हळद अशी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना 12 ते 18 महिन्यांतून एकदाच पैसे हातात येतात. परंतु शेतकऱ्यांच्या हातात टप्प्या-टप्प्याने पैसे येत राहणे गरजेचे असते. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आंतरपीक पद्धतीविषयी प्रयोगशील शेतकरी विनोद तोडकर यांच्याकडून अधिक माहिती घेतली आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कासेगावचे रहिवासी असलेले विनोद तोडकर हे प्रयोगशील शेतकरी आहेत. वाळवा तालुका परिसरामध्ये त्यांची शेतजमीन असून यापैकी आष्टा नजीक कारंदवाडी येथे शेतजमीन आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून असलेला शेतीचा अनुभव आणि स्वतः जिज्ञासूपणे केलेल्या अभ्यासाच्या जोरावर विनोद तोडकर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत.
advertisement
त्यांनी आजवर ऊस, हळद, ढोबळी मिरची तसेच विदेशी भाजीपाला पिकांमध्येदेखील दर्जेदार उत्पादनाचे विक्रम गाठले आहेत. शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून शेतीचे आरोग्य आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. आंतरपीक पद्धतीतून शेतकऱ्यांच्या हातात खेळते भांडवल राहते, असा तोडकर यांचा अनुभव आहे.
हळद, ऊस यांसारखी पिके घेतली तर 12 ते 18 महिने शेतकऱ्यांना भांडवली खर्च करावा लागतो. इथेच शेतकऱ्यांना आंतरपीक प्रयोगाचा फायदा होऊ शकतो. यातून पैसे येणे चालू राहते. त्यामुळे मुख्य पिकासाठी भरणी आणि अन्नद्रव्य, औषध व्यवस्थापन वेळच्या वेळी करणे शक्य होते.
advertisement
स्वतःच्या शेतात असा प्रयोग
प्रयोगशील शेतकरी विनोद तोडकर यांनी स्वतःच्या शेतामध्ये एक नव्हे तर दोन आंतरपिकांचा प्रयोग केला आहे. हळद या मुख्य पिकाची बेडवरती दोन्ही बाजूंनी लावण केली आहे. तसेच हळदीच्या दोन ओळींमध्ये बेडवर मधोमध कोथिंबीरचे पीक घेतले आहे.
तसेच सरीच्या बाजूने मार्केटला चालणारे स्वीट कॉर्नचे पीक घेतले आहे. यापैकी बेडवर टाकलेल्या पालेभाजीतून 30 ते 35 दिवसांमध्ये पैसे हातात येतात. तसेच स्वीट कॉर्नमधून तीन महिन्यांत पैसे हातात येतात. हळदीच्या भरणीपर्यंत दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांकडे पैसे येत असल्याचे तोडकर सांगतात.
advertisement
एकाहून अधिक आंतरपिके घेताना प्रत्येक पिकाचे खत व्यवस्थापन पिकाच्या आवश्यकतेनुसार वेगळे करण्याची गरज शेतकरी विनोद तोडकर यांनी आवर्जून सांगितली. अभ्यासपूर्ण प्रयोगातून सिद्ध केलेली आंतरपीक पद्धती शेतकऱ्यांचे अर्थकारण प्रवाही राहण्यासाठी निश्चितच उपयोगी होईल.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
July 18, 2025 10:21 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
हातात राहील पैसा, आंतरपीक पद्धती कशी फायदेशीर? प्रयोगशील शेतकऱ्याने सांगितला अनुभव, Video