Mosambi Farming: शेतकऱ्यावर नवं संकट, तोडणीला आलेली फळबाग उद्ध्वस्त, मार्केटही पडलं, डोळ्यात पाणी!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Mosambi Farming: पैठणला मोसंबीचं माहेरघर मानलं जातं. यंदा या ठिकाणी मगरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून बाजारभावही पडले आहेत. मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात आहे.
छत्रपती संभाजीनगर: मोसंबीचे माहेर घर म्हणून पैठणचा सर्वदूर नावलौकिक आहे. आता येथील गोड मोसंबीला मगरी रोगाचा फटका बसला आहे. या रोगामुळे मोसंबीची फळगळ वाढली असून झाडांखाली फळांचा सडा पडत आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर मार्केटमध्ये मागणीच नसल्याने दरांत देखील मोठी घसरण झाली असून मोसंबी उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे. याबाबत पैठणमधील मोसंबी उत्पादक शेतकरी लक्ष्मण बनकर यांनी माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका हा मोसंबी उत्पादनात मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागांची लागवड करून उत्पन्नाचे स्वप्न उराशी बाळगून आहे. पैठणमधील 10 हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबी लागवड असून त्यापैकी 8 हजार हेक्टरवरील क्षेत्रावरती मोसंबी उत्पादन देणारी आहे. मात्र मोसंबी फळबागेवर मगरी रोगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी हैराण झाला असून मोठ्या नुकसानीची भीती सतावत आहे.
advertisement
यंदा पावसाचा खंड पडल्यामुळे मोसंबीच्या फळाची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी जमिनीमध्ये तापमान वाढल्याने मोसंबीला याचा फटका बसला. जुलैच्या सुरुवातीला मोसंबीला चांगला भाव असल्या कारणांमुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची मोसंबी 15 हजार रुपये ते 19 हजार रुपये या भावाने खरेदी केली आहे. मात्र आज तीच मोसंबी 12 हजार रूपये प्रतिटनाने विक्री होत असल्याने व्यापारी वर्ग देखील संकटात सापडला असल्याचे व्यापारी सुनील बनसोड यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
मोसंबीच्या फळबागेवर मगरी रोग पडल्याने शेतकरी धास्तावले असून औषध फवारणी करून देखील प्रादुर्भाव कमी होत नसल्याने कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. फळगळ झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अर्थिक मदत करावी. तसेच मोसंबीच्या बागेवर डास, डाग देखील झाले आहेत. त्यामुळेही मोसंबीचे फळ खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पैठण तालुक्यात त्वारित मोसंबीचा फळबाग विमा मंजूर करावा, अशी मागणी मोसंबी फळबाग शेतकरी लक्ष्मण बनकर यांनी केली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 18, 2025 1:18 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Mosambi Farming: शेतकऱ्यावर नवं संकट, तोडणीला आलेली फळबाग उद्ध्वस्त, मार्केटही पडलं, डोळ्यात पाणी!