ऐन दिवाळीत बळीराजावर संकट, पाडव्याच्या मुहूर्ताने केली निराशा, सोयाबीनला भाव नाहीच
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर देखील निराशाच पडल्याचे पाहायला मिळालं. पाहूयात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दराची काय स्थिती आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : सोनं खरेदी करण्यासाठी ज्या पद्धतीने मुहूर्त पाहिले जातात. त्याच पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यासाठी दिवाळी पाडवा हा मुहूर्त अतिशय उत्तम असतो. यादिवशी शेतमाल खरेदी करताना वापरण्यात येणाऱ्या वजनिकाट्याची पूजा केली जाते. त्याचबरोबर हिशोबाच्या नवीन वह्यांचे देखील पूजन केलं जातं. प्रत्येक व्यापारी थोडाफार का होईना शेतमालाची खरेदी करून नवीन वर्षाची सुरुवात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिवाळी पाडव्याच्या दिवशी शेत मालाला अधिक दर मिळेल ही भावना असते. मात्र यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर देखील निराशाच पडल्याचे पाहायला मिळालं. पाहूयात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दराची काय स्थिती आहे.
advertisement
दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच शनिवारी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक तशी कमीच राहिली. दररोज 25 ते 30 हजार क्विंटल येणारी सोयाबीनची आवक दिवाळी पाडव्याच्या दिवशी केवळ 15 ते 16 हजार क्विंटलच्या आसपास होती. या दिवशी 4500 ते 5000 रुपये प्रति क्विंटल असा दर सोयाबीनला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्यांची ही अपेक्षा फोल ठरली. मागील आठवड्यात सोयाबीनला मिळत असलेल्या दरावरच सोयाबीनची खरेदी करण्यात आली.
advertisement
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या दिवशी दहा मॉईश्चर असलेल्या सोयाबीनला 4400 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला तर 14 ते 15 मॉईश्चर असलेल्या सोयाबीनला 4000 ते 4100 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतोय साधारणपणे 3500 ते 4400 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे दर आहेत, असं व्यापारी संजय कानडे यांनी सांगितलं.
advertisement
दिवाळी पाडव्याच्या दिवशी आम्ही सोयाबीन विक्रीसाठी आणलं होतं. आम्हाला 4500 ते 5000 रुपये क्विंटल भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सोयाबीनला 4100 ते 4200 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. सोयाबीनची 30 किलोची बियाणे बॅग 4000 रुपयांना खरेदी करावी लागते मात्र तेच शेतकऱ्यांनी पिकवलेलं एक क्विंटल सोयाबीन 4000 रुपयातच खरेदी केलं जात आहे. हे कुठेतरी बदलायला हवं, असं युवा शेतकरी विजय कोल्हे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Nov 02, 2024 5:27 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
ऐन दिवाळीत बळीराजावर संकट, पाडव्याच्या मुहूर्ताने केली निराशा, सोयाबीनला भाव नाहीच









