सोयाबीनला 6 हजार भाव देणार, PM मोदींचं आश्वासन, पण शेतकऱ्यांनी सगळंच काढलं..
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Soybean Rate: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला 6 हजार हमीभाव देण्याची घोषणा केलीये. यावर बोलताना शेतकऱ्यांनी हिशोबच मांडला आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा केल्या जात आहेत. मराठवाड्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 6 हजार रुपये एवढा हमीभाव देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलंय.
advertisement
सध्या राज्यात सोयाबीनला 4 हजार 892 एवढा हमीभाव आहे. मात्र खुल्या बाजारात सोयाबीनला साडेतीन हजारांपासून 4 हजार चारशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 500 ते 1000 रुपये कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. सोयाबीन उत्पादकांच्या नाराजीचा मुद्दा निवडणुकीमध्ये ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 हजार हमीभाव देण्याची घोषणा केलीये. याबाबत जालना येथील शेतकऱ्यांनी लोकल18 सोबत बोलताना आपल्या रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
advertisement
आता काय फायदा?
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किनोळा येथील शेतकरी संजय साळवे यांनी 12 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं होतं. या सोयाबीनला 3800 रुपये एवढा दर मिळाला. "आम्हाला साडेतीन ते चार हजार रुपये दर मिळाला. पुढे काय होईल याची काहीही शाश्वती नाही. आम्ही विकून मोकळे झालो. आता कितीही दर मिळाला तर काय फायदा,” अशी भावना शेतकरी साळवे यांनी व्यक्त केली.
advertisement
सरकार भूल थापा मारतंय
किशोर भुजंग या शेतकऱ्याने 2 एकर शेतामध्ये सोयाबीन पेरलं होतं. यापैकी अर्ध सोयाबीन पाण्याने खराब झालं. केवळ पाच ते सहा क्विंटल सोयाबीन दोन एकरात झालं. या सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये दर मिळाला. “निवडणुका जवळ आल्याने सरकार भूल थापा मारत आहे पाच वर्ष सरकार काय झोपलं होतं का? तेव्हा आम्हाला 6 हजार रुपये भाव दिला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया किशोर भुजंग या युवा शेतकऱ्याने व्यक्त केली.
advertisement
भाव देतील असं वाटत नाही
भोकरदन तालुक्यातील लोणगावचे शेतकरी विठ्ठल राजाळे यांनी दोन एकर सोयाबीन पेरलं होतं. यामध्ये त्यांना अकरा कट्टे सोयाबीनचे उत्पन्न झालं. ही सोयाबीन विक्रीसाठी बाजारात ते घेऊन आलेत. सोयाबीनला 3200 ते 4000 च्या दरम्यान दर मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच “6000 रुपये भाव देतील असं काही वाटत नाही. सध्या साडेतीन ते चार हजार रुपये भाव मिळतोय. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली. पण शेतमालाला भाव नाही. अशा शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असल्याचं राजळे यांनी सांगितलं.
advertisement
जानेफळ येथील शेतकरी दादाराव मिसळ यांनी एक एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. त्यांनी अजून या पिकाची काढणी केली नाही. सोयाबीनला शेंगाच नसल्याने पिकाची काढणी केली नसल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांना असे दर असतील तर सोयाबीनचा खर्चही निघणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Nov 16, 2024 3:53 PM IST







