सांगलीच्या ड्रोनदीदीला राष्ट्रपतींनी दिल्लीला बोलावलं, वैष्णवी शिंदेंची थक्क करणारी कहाणी

Last Updated:

आधुनिक आणि यांत्रिकीकरणाच्या शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी भारत सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. याच योजनेचा लाभ घेत सांगलीच्या वैष्णवी शिंदे ड्रोन पायलट बनल्या आहेत.

+
News18

News18

प्रीती निकम,प्रतिनिधी 
सांगली : भारतीय कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग अगदी पूर्वीपासूनच महत्त्वाचा राहिलाय. शेतीच्या उत्क्रांतीत लागवडीपासून काढणी-मळणी पर्यंत सर्वच कामात महिला आघाडीवर राहिल्या आहेत. आधुनिक आणि यांत्रिकीकरणाच्या शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी भारत सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. याच योजनेचा लाभ घेत सांगलीच्या वैष्णवी शिंदे ड्रोन पायलट बनल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान अवगत करत कृषी क्षेत्रात नवे पाऊल टाकल्याबद्दल ड्रोन दीदी वैष्णवी यांना राष्ट्रपतींकडून प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण मिळाले आहे. पाहुयात गृहिणी ते ड्रोन पायलट वैष्णवी शिंदे यांची यशोगाथा.
advertisement
वैष्णवी परशुराम शिंदे सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगावच्या रहिवाशी आहेत. सध्या त्या ड्रोन पायलट म्हणून काम करतात. बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून पुढेही शिकण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या नमो ड्रोन दीदी योजनेतून ड्रोन पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पिकांवरती कीडनाशक, बुरशीनाशक आणि औषधांच्या फवारणीसाठी वैष्णवी यांना शासकीय योजनेतून ड्रोन मिळाला आहे.
advertisement
पंतप्रधान नमो ड्रोन दिदी योजनेतून त्यांना मिळालेल्या ड्रोनच्या साहाय्याने त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. या माध्यमातून त्या मोहिते वडगाव आणि परिसरातील दोन तालुक्यांमध्ये फवारणी करत आहेत. सांगलीचा सोनहिरा परिसर हा ऊस पट्ट्यासह प्रयोगशील शेतीचा भाग असल्याने ड्रोन फवारणीसाठी मागणी वाढत आहे.
advertisement
वैष्णवी यांचे पती परशुराम हे शेतकरी आहेत. स्वतःच्या शेतीसह ते गावातील ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्रामध्ये काम करतात. ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्र चालक अभिजीत खारगे यांच्या माध्यमातून शिंदे पती-पत्नीस ड्रोन योजने विषयीची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कष्टाळू, प्रामाणिक आणि जिद्दी पती-पत्नींना योजनेचा लाभ मिळाल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
वैष्णवी यांनी नमो ड्रोन दीदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला आणि काही दिवसात त्यांचा अर्ज मंजूर झाला. यानंतर त्यांनी सासवड- पुणे या ठिकाणी ड्रोन पायलटचे पंधरा दिवसाचे निवासी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर दोन महिन्यात त्यांना ड्रोन घरपोच मिळाला. ड्रोन मिळाल्यानंतरही कंपनीच्या प्रतिनिधींकडून त्यांना तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. पुढील काही दिवस त्यांनी स्वतःच्या शेतावर सराव केला. आणि नंतर ऑर्डर प्रमाणे त्या शेतकऱ्यांच्या शेतावर ड्रोनद्वारे फवारणी करतात.
advertisement
पाणी, औषध आणि वेळेची बचत
पारंपारिक पद्धतीने एका एकराला फवारणी करण्यासाठी साधारणपणे 200 लीटर पाणी लागते. पण ड्रोन फवारणीमध्ये केवळ 10 ते 15 लीटर पाण्यामध्ये एका एकरावरील फवारणी पूर्ण होते. आणि या फवारणीसाठी केवळ 7 ते 10 मिनिटे वेळ लागतो. विशेष म्हणजे दोन एकरसाठी लागणाऱ्या औषधामध्ये तीन एकरची फवारणी ड्रोनद्वारे होते. त्यामुळे ड्रोन तंत्रज्ञान फायद्याचे असल्याचे ड्रोन पायलट वैष्णवी सांगतात.
advertisement
सन्मान आणि कौतुक
ड्रोन दिदी असलेल्या वैष्णवी यांच्या कामाची दखल अनेक पातळीवर घेण्यात आली आहे. नुकतेच त्यांना 26 जानेवारी 2025 च्या प्रजासत्ताक दिनामध्ये राष्ट्रपती भवन दिल्ली येथे उपस्थित राहण्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे निमंत्रण पत्र आले आहे. ड्रोन दीदी वैष्णवी यांना गाव परिसरातील राजकीय नेत्यांसह सामान्य लोक ही कौतुक करत शुभेच्छा देतात. राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानाच्या पत्राने गावातील प्रत्येकास वैष्णवी यांचा अभिमान वाटतो आहे.
advertisement
सासर-माहेरची मोठी साथ
ड्रोन पायलट वैष्णवी शिंदे यांना पती परशुराम यांच्यासह सासर आणि माहेरच्या लोकांची मोठी साथ असल्याचे त्या सांगतात. निवासी प्रशिक्षणासाठी पंधरा दिवस बाहेरगावी राहण्याची वेळ आली होती. तेव्हा दीड वर्षाच्या बाळाला माहेरी ठेवून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. फवारणीसाठी बाहेरगावी शेतामध्ये जाण्यासाठी त्यांच्या पतीचा नेहमी पाठिंबा असतो.
'लग्नानंतर खेड्यामध्ये आले तेव्हा काही करेन असे वाटले नव्हते. परंतु ड्रोन दीदी योजनेमुळे आणि पतीच्या पाठिंबामुळे मी माझी वेगळी ओळख निर्माण करू शकले' असे ड्रोन पायलट वैष्णवी शिंदे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
किती मिळते उत्पन्न
एका एकर ड्रोन फवारणीसाठी 600 रूपये आकारले जातात. वैष्णवी यांना या वर्षाभरामध्ये ड्रोन प्राप्त झाला. परंतु यंदा सततच्या पावसाने ड्रोनचा वापर फारसा करता आला नाही. तरीही आत्तापर्यंत त्यांनी 200 एकर क्षेत्रात ड्रोन फवारणी केली आहे. गावासह परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून ड्रोन फवारणीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता मिळालेल्या शासकीय योजनेच्या लाभामुळे ड्रोन पायलट वैष्णवी शिंदे यांना आर्थिक धैर्य मिळते आहे.
मराठी बातम्या/कृषी/
सांगलीच्या ड्रोनदीदीला राष्ट्रपतींनी दिल्लीला बोलावलं, वैष्णवी शिंदेंची थक्क करणारी कहाणी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement