सोयाबीनच्या दरात मोठी उलथापालथ! शेतकऱ्यांना दिलासा, सध्याचा बाजारभाव काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soybean Bajar Bhav : सध्या जागतिक बाजारात सोयाबीन तेलाची मागणी वाढत आहे, त्यामुळे देशांतर्गत दरात वाढ होताना दिसते आहे.
अहिल्यानगर : गेल्या वर्षभरापासून दरवाढीची आशा बाळगणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा संपल्यासारखी वाटत असली, तरी प्रत्यक्षात दर वाढले असतानाही त्यांच्या हाती काहीच येत नाही. कारण, बहुतेक शेतकऱ्यांनी यंदा कमी दर मिळत असल्याने आधीच आपला माल विकून टाकला आहे. सध्या सोयाबीनचे दर 450 रुपये पर्यंत वाढले असले, तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीन उरलेलेच नाही.
भाव वाढले, पण माल संपला
केडगाव परिसरातील अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी फक्त 66 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला 4200 ते 4450 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असून तो आता 4500 रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
मात्र, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीन उरलेले नाही. अनेकांनी दिवाळीच्या दरम्यान दर वाढतील, या आशेने माल रोखून धरला होता. पण अपेक्षा फोल ठरल्या आणि गरजेपोटी कमी दरातच विक्री करावी लागली.
advertisement
हमीभावात वाढ
मागील वर्षी सरकारने सोयाबीनसाठी 4892 रुपये हमीभाव जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र अनेकांना या दराने माल विकता आला नाही. अनेक तांत्रिक आणि कागदपत्रांच्या अडचणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना नाफेड खरेदी केंद्रांवर विक्री करता आली नाही. परिणामी, बाजारात मिळेल त्या दरातच माल विकावा लागला.
यंदाच्या वर्षी केंद्र सरकारने हमीभावात 426 रुपयांची वाढ करत 5328 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे. मात्र, त्याचा प्रभाव प्रत्यक्षात हंगाम सुरू झाल्यावरच दिसून येईल.
advertisement
जागतिक बाजाराचा परिणाम
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडीत पीक असल्याने, जागतिक स्तरावर होणाऱ्या घडामोडींचा याच्या दरावर थेट परिणाम होतो. सध्या जागतिक बाजारात सोयाबीन तेलाची मागणी वाढत आहे, त्यामुळे देशांतर्गत दरात वाढ होताना दिसते आहे.
नाफेडच्या साठ्यामुळेही दरावर परिणाम
गतवर्षी नाफेडने मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केल्याने शासनाकडे साठा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. मागील दोन महिन्यांपासून नाफेडने साठा विक्रीस काढला आहे. त्यामुळे बाजारातील मागणी-पुरवठा ताळमेळ काहीसा बदलला असून दर वाढले आहेत.
advertisement
नवीन हंगामाकडे लक्ष
view commentsयंदा पावसाचा काहीसा उशीर आणि परतीचा प्रभाव लक्षात घेता सोयाबीन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन हंगामात खरच दर टिकून राहतात का? आणि शेतकऱ्यांना नफा मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 11:08 AM IST


