Soil Care: भरघोस पीक हवंय? शेतीतील मातीची अशी घ्या काळजी, होईल फायदा, Video
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
एका बाजूला हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे, तर दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेने काटेकोर शेतीचे युग सुरू झाले आहे. या दोन टोकांची सांगड घालत भविष्यात शेती पाहायची असेल तर वर्तमानात मातीचे आरोग्य जपणे आवश्यक ठरते.
सांगली: शेती आणि शेतकरी आजच्या घडीला मोठ्या स्थित्यंतरातून जात आहेत. एका बाजूला हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे, तर दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेने काटेकोर शेतीचे युग सुरू झाले आहे. या दोन टोकांची सांगड घालत भविष्यात शेती पाहायची असेल तर वर्तमानात मातीचे आरोग्य जपणे आवश्यक ठरते. म्हणूनच शाश्वत शेतीसाठी मातीची नेमकी काय काळजी घ्यावी? याविषयी लोकल 18 च्या प्रतिनिधींनी सांगलीचे प्रयोगशील शेतकरी विनोद तोडकर यांच्याकडून अधिक जाणून घेतले.
हवामान बदलाच्या संकटाची चर्चा करताना एक सार्वत्रिक निराशेचा सूर जाणवतो. शेतीचे भवितव्य अंधकारमय आहे, अशीच जणू मांडणी केली जाते. परंतु प्रत्यक्षात या संकटाला तोंड देण्यासाठी शेती हे ओझे नसून ती एक खूप मोठी संधी असल्याचे मत अनेक अर्थतज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक मांडत आहेत. जंगल आणि शेती हे नैसर्गिक कार्बन संकुल असून ते वातावरणातील कार्बनचे प्रमाण संतुलित करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हवामान बदलाची तीव्रता कमी होते.
advertisement
पर्यावरण आणि जैवविविधतेचे संवर्धन झाले तर अनेक इकोसिस्टिम सेवा पुरवता येतात. नैसर्गिक परिसंस्था, जैवविविधता वाढली की कार्बन ऑफसेट, जैवविविधता क्रेडिट्स वगैरेमधून चांगले उत्पन्न मिळवण्याच्यादेखील संधी दिसतात. आपण मातीवर शेती करतो, म्हणून मातीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प्रयोगशील शेतकरी विनोद तोडकर यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केले.
advertisement
अशी घ्या मातीची काळजी
उसाची शेती करताना उसाचा पाला न जाळता त्याची शेतातच कुट्टी करावी. शेतातील कुठल्याही प्रकारचा पालापाचोळा, पिकांचे अवशेष जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी वापर करावा. मातीची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना तागासारखे एखादे पीक मातीमध्ये गाढावे. जमिनीमध्ये वर्षानुवर्षे एकच पीक घेण्याऐवजी पिकामध्ये फेरपालट करायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतामध्ये करंजीपेंड, निंबोळी पेंड यांसारख्या खतांच्या वापराकडे विशेष लक्ष द्यावे.
advertisement
मातीची योग्य ती काळजी घेऊन मातीचे आरोग्य सुधारले तर पीक व्यवस्थापनासाठी येणाऱ्या खर्चामध्ये मोठी बचत होत असल्याचा अनुभवदेखील विनोद तोडकर सांगतात. याशिवाय विषमुक्त उत्पादने मिळवण्यासाठी मातीची योग्य ती काळजी घेणे सर्वात प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाची कृती असल्याचे शेतीनिष्ठ विनोद तोडकर यांनी सांगितले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Aug 12, 2025 4:57 PM IST








