Success Story : पुण्यातील नोकरी सोडली, गावाकडं दाखवलं शेती करण्याचं धाडस, कांद्यामधून 3 लाख उत्पन्न
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मर्यादित दीड एकर जमीन असूनही शेतीतून काहीतरी वेगळं करता येईल, असा आत्मविश्वास त्याच्या या निर्णयामागे होता.
बीड : आजही अनेक तरुण नोकरीकडेच सुरक्षित भविष्याचा मार्ग मानतात. मात्र काही जण पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून स्वतःची वाट शोधतात. बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील 26 वर्षीय तरुण विष्णू राठोड यांनी असाच धाडसी निर्णय घेतला. पुण्यासारख्या शहरात खासगी कंपनीत 18 हजार रुपयांवर नोकरी करत असतानाही समाधान न मिळाल्याने आणि घरची शेती वाया जाऊ नये या विचाराने त्याने कंपनीची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मर्यादित दीड एकर जमीन असूनही शेतीतून काहीतरी वेगळं करता येईल, असा आत्मविश्वास त्याच्या या निर्णयामागे होता.
घरच्यांच्या सल्ल्याने पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांकडे वळण्याचा विचार करण्यात आला. सहकारी मित्रांच्या मार्गदर्शनाने त्याने कांदा लागवडीचा पर्याय निवडला. सुरुवातीला पूर्ण क्षेत्रात लागवड न करता, जोखीम टाळण्यासाठी फक्त 10 गुंठे क्षेत्रात कांद्याची लागवड करण्यात आली. योग्य नियोजन, वेळेवर लागवड आणि आवश्यक तेवढीच गुंतवणूक केल्याने पहिल्याच हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळाला. यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय चुकीचा नव्हता, याची त्याला खात्री झाली.
advertisement
पहिल्या यशानंतर पुढील वर्षी लागवडीखालील क्षेत्र वाढवण्यात आले. अर्ध्या एकरात कांदा लागवड करताना उत्पादन खर्च, पाणी व्यवस्थापन आणि कीडनियंत्रणावर विशेष लक्ष देण्यात आले. बाजारभावाचा अभ्यास करून योग्य वेळी विक्री केल्यामुळे चांगले आर्थिक गणित जुळून आले. वाढत्या अनुभवामुळे शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहण्याची सवय लागली आणि कांदा हेच मुख्य पीक म्हणून निश्चित करण्यात आले.
advertisement
मागील चार वर्षांपासून हा तरुण शेतकरी एक एकर क्षेत्रात सातत्याने कांदा लागवड करत आहे. मर्यादित क्षेत्र असूनही योग्य व्यवस्थापन आणि कष्टाच्या जोरावर एका सीजनमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं आहे. कंपनीतील निश्चित पगारापेक्षा शेतीतील उत्पन्न अधिक लाभदायक ठरत असल्याचा अनुभव तो आज अभिमानाने सांगतो.
कंपनीची नोकरी सोडून शेतीकडे वळण्याचा निर्णय अनेकांना धाडसी वाटतो. मात्र नियोजन, आधुनिक विचारसरणी आणि मेहनत यांच्या जोरावर एक एकरातही यशस्वी शेती शक्य आहे, हे या तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. त्याची यशोगाथा आज ग्रामीण भागातील अनेक तरुणांना शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देत आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 4:33 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : पुण्यातील नोकरी सोडली, गावाकडं दाखवलं शेती करण्याचं धाडस, कांद्यामधून 3 लाख उत्पन्न








