मुंबई : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. काही बाजारांत उच्च प्रतीच्या सोयाबीनला चांगला भाव मिळाला असला, तरी काही ठिकाणी कमी प्रतीमुळे दरावर दबाव राहिला. एकूणच सोयाबीनचे सर्वसाधारण दर 4,400 ते 5,100 रुपयांच्या आसपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे.
advertisement
सध्याचे भाव काय?
मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक नोंदवली गेली. लातूर बाजार समितीत सर्वाधिक 13,457 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे पिवळ्या सोयाबीनला किमान 4,260 रुपये तर कमाल 5,181 रुपये दर मिळाला असून, सर्वसाधारण दर 5,040 रुपये राहिला. लातूर-जालना पट्ट्यातील जालना बाजारातही 5,721 क्विंटलची आवक झाली असून, येथे सोयाबीनला थेट 5,353 रुपयांचा कमाल व सर्वसाधारण दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
विदर्भात अमरावती बाजार समितीत 5,307 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे लोकल सोयाबीनला 4,800 ते 5,015 रुपये दर मिळून सरासरी 4,907 रुपये भाव नोंदवला गेला. अकोला बाजारात 7,317 क्विंटल आवक असून, सर्वसाधारण दर 4,670 रुपये राहिला. वाशीम बाजारात मात्र चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला मोठी मागणी दिसून आली. येथे 3,300 क्विंटल आवक असून, कमाल दर थेट 6,321 रुपयांपर्यंत पोहोचला, तर सरासरी दर 5,800 रुपये राहिला. खामगाव बाजारातही 8,505 क्विंटलची मोठी आवक झाली असून, येथे सरासरी दर 5,625 रुपये नोंदवण्यात आला.
मराठवाड्यात माजलगाव आणि रिसोड या बाजारांमध्ये मोठी आवक झाली. माजलगावमध्ये 1,705 क्विंटल सोयाबीनची आवक असून, सर्वसाधारण दर 4,900 रुपये राहिला. रिसोडमध्ये 1,800 क्विंटल आवक नोंदवली गेली असून, येथे सरासरी दर 4,800 रुपये मिळाला. हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील बाजारांमध्ये दर साधारणपणे 4,700 ते 4,950 रुपयांच्या दरम्यान राहिले.
खान्देश भागात पाचोरा आणि धुळे बाजारांत संमिश्र चित्र दिसून आले. पाचोरामध्ये 250 क्विंटल आवक असून, सरासरी दर 4,200 रुपये राहिला, तर धुळ्यात हायब्रीड सोयाबीनला 4,650 रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. जळगाव बाजारात मात्र लोकल सोयाबीनला 5,000 रुपयांचा स्थिर भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले.
