मुंबईसह कोकणाला अलर्ट
मुंबईसह उपनगरांमध्ये आकाश ढगांनी आच्छादलेले राहणार असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत विजांच्या गडगडाटासह पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात जोर कायम
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. घाटमाथ्याच्या भागात विशेषतः मुसळधार पावसाची शक्यता असून, दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात प्रमाण कमी राहणार
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतीच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरेल, मात्र वीजेपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्याची चिंता वाढली
मराठवाड्याच्या दृष्टीनेही 20 जुलै महत्त्वाचा ठरणार आहे. संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात पावसाने काहीशी उशीराने हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. आता या भागात पावसाचा जोर वाढल्यास खरीप हंगामाला चालना मिळेल.
विदर्भात अलर्ट जारी
विदर्भात मात्र हवामान अधिकच अस्थिर राहण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि वाशिम या सर्व 11 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने शाळा, महाविद्यालयांसह नागरिकांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्यात पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी आणि अधिकृत सूचना लक्षपूर्वक पाळाव्यात.