कोकणात यलो अलर्ट
29 जुलै रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर राहू शकतो. मात्र सिंधुदुर्गसह अन्य कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र 30 जुलैनंतर काही दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
'या' जिल्ह्यांना पुराचा धोका
पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच साताऱ्यातील कोयना, धोम आणि कन्हेर धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. यामुळे विठुरायाच्या पंढरपूर शहरावर पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रात 50 हजार क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कृषी सल्ले
कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी प्रादेशिक कृषी हवामान केंद्र दापोली व मुळदे यांनी महत्त्वाचे कृषी सल्ले दिले आहेत. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी भात, नाचणी, हळद, भुईमूग पिकांतून तसेच फळबागांमध्ये पाण्याचा निचरा होईल यासाठी योग्य उपाययोजना करावी. नव्याने लागवड केलेल्या आंबा, नारळ, काजू व सुपारी फळबागांना पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून झाडांना आधार द्यावा. पावसाचा जोर असताना रासायनिक खते व फवारणी पुढे ढकलावी. रायगड व पालघर जिल्ह्यांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे भाताची नवीन लागवड टाळावी. भाताच्या रोपांची पुनरलागवड पावसाचा जोर कमी असताना करावी, तसेच पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेमी दरम्यान राखावी.
मध्य महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला
पुणे, जळगाव, सोलापूर जिल्ह्यांसाठी प्रादेशिक कृषी हवामान केंद्र पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटमाथ्याच्या भागात 25-26 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता होती. त्यामुळे भातशेतीत पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घ्यावी. मुसळधार पावसामुळे भाताची लागवड थोडी पुढे ढकलावी. 21-25 दिवसांची रोपे वापसा स्थितीत असताना लागवड सुरू ठेवावी. खतांचा वापर आणि फवारणी काही दिवस थांबवावी.
दरम्यान, शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यामुळे संभाव्य नुकसान टाळता येईल आणि उत्पादनात सातत्य राखता येईल.
