कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागातील समुद्र किनाऱ्यावर विजांचा कडकडाट, जोरदार वारं आणि पुराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परिणामी किनारपट्टीच्या गावांमध्ये भूस्खलन होऊ शकते. स्थानिक प्रशासनाने तटीय भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाणे टाळावे, तसेच अत्यावश्यक नसल्यास प्रवासही न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. विशेषत: घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट परिसरात वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ शकतात. नदी-नाले तुडुंब वाहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील काही ठिकाणी सलग काही तास पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक असेल. यामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार असली, तरी शेतकऱ्यांनी पेरणी करताना हवामानाचा अंदाज विचारात घ्यावा. पेरणीची घाई केल्यास नंतर पावसात खंड पडल्यास नुकसान होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट
विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाची तीव्रता वाढणार आहे. या भागातील नागरिकांनी वीज पडण्याच्या धोक्यामुळे सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त झाली आहे.