कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा धोका कायम
कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील भागांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे तसेच वाहतुकीला अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही घाटमाथ्यांवरही अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.
advertisement
विदर्भात पावसाचा जोर कायम
राज्यात इतर ठिकाणी पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी विदर्भात मात्र पाऊस जोरात सुरू आहे. आज संपूर्ण विदर्भासाठी 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला असून, सततच्या पावसामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकांवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
मराठवाडा आणि इतर भागांत कमी पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचा धोका नाही. या भागांसाठी 'ग्रीन अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
खरीप पिकांची काळजी कशी घ्यावी?
सततच्या पावसामुळे पाण्याचा निचरा नीट होणं गरजेचं आहे. शेतात पाणी साचल्यास मुळे कुजण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी व सरी-वरंबा पद्धतीने पाण्याचा निचरा करावा. तण व्यवस्थापनावर लक्ष द्यावे आणि आवश्यक असल्यास बुरशीजन्य रोगांपासून बचावासाठी योग्य फवारणी करावी. सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसारख्या खरीप पिकांवर कीड व रोगांची लक्षणे दिसल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा.
प्रशासनाकडून आवाहन
हवामानातील बदल लक्षात घेता प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
