दोन हवामान प्रणालींचा दुहेरी प्रभाव
सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन वेगळ्या हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रीय आहेत. गुजरात-महाराष्ट्र किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. या प्रक्रियेत टर्फ लाईन म्हणजेच कमी दाबाची रेषा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही रेषा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून पुढे सरकत बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचत आहे.
advertisement
दरम्यान, आंध्र प्रदेशच्या आसपासही एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या दोन प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यातील हवामान अस्थिर झाले असून, कधी ऊन तर कधी मुसळधार पावसाची स्थिती निर्माण होत आहे. परिणामी, मॉन्सूनचा परतीचा प्रवास काही दिवस लांबणीवर पडला आहे.
मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात ५ ऑक्टोबरपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.
कोकण किनारपट्टी : येथे सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, नाशिकसह घाटमाथ्यावरील भागांत पावसाची तीव्रता वाढेल.
विदर्भ आणि मराठवाडा : निवडक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत.
वादळाचा धोका?
सध्याच्या प्रणाली पुढील ४८ तासांत किती तीव्र होतात हे निर्णायक ठरणार आहे. जर कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढली, तर त्यांचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सतर्कतेचा इशारा
सध्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. तरीही, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की परिस्थिती गंभीर झाली तर पुढील ४८ तासांत रेड अलर्ट जारी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचना लक्षात ठेवून खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कृषी सल्ला काय?
१) सोयाबीन
पानांवर खालच्या बाजूस तपकिरी डाग दिसल्यास ‘कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब’ मिश्रणाची फवारणी करावी. पानगळी अळी किंवा खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास ‘क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल’ किंवा ‘लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिन’ घटक असलेल्या औषधांची फवारणी करावी.
२) कापूस
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘स्पायनेटोरॅम’ किंवा ‘एमॅमेक्टिन बेन्झोएट’ यांची फवारणी उपयुक्त ठरते. थ्रिप्स व रसशोषक किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इमिडाक्लोप्रिड’ किंवा ‘अॅसिटामिप्रिड’ घटक असलेले औषध वापरावे.
३) मका
लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास ‘स्पिनोसेड’ किंवा ‘क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल’ फवारावे. डाग रोग किंवा डाउनी मिल्ड्यू दिसल्यास ‘मॅन्कोझेब’ किंवा ‘मेटॅलेक्सिल’ मिश्रणाची फवारणी प्रभावी ठरते.