मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांवर पावसाचे भीषण संकट ओढवले आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहेत. उपजीविकेचे साधन नाहीसे झाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी जीवन संपवण्याच्या मार्ग स्वीकारला.
advertisement
विजेच्या तारेचा स्पर्श करून जीवन संपवलं
बीड : केज तालुक्यातील बोरगाव येथील रमेश ज्ञानोबा गव्हाणे (६२) या शेतकऱ्याने मंगळवारी शेतातून गेलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श करून जीवन संपवले.
कारण काय?
सोयाबीनचे पीक पूर्णपणे कुजले, तर नदीकाठची आठ एकर सुपीक जमीन पुरात वाहून गेली. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, याची काळजी त्यांना सतावत होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार मागे राहिला आहे.
गोठ्यात संपवलं जीवन
धाराशिव : भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे लक्ष्मण बाबासाहेब पवार (४२) यांनी बुधवारी शेतातील गोठ्यात गळफास घेत जीवन संपवलं
कारण काय?
एका हेक्टरवरील पिके पुरात वाहून गेली. दोन वासरे मृत्युमुखी पडली. याशिवाय कर्ज काढून घेतलेल्या दोन ट्रॅक्टरचे हप्ते फेडण्याचे संकट डोईजड झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन लहान मुले असा संसार उद्ध्वस्त झाला.
सात लाखांचे कर्ज, जीवन संपवलं
सोलापूर : बार्शी तालुक्यातील कारी गावातील तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर (३९) यांनी बुधवारी सकाळी झाडाला गळफास घेतला.
कारण काय?
साडेतीन एकरवरील पेरू, लिंबू आणि इतर पिके पाण्यात गेली. त्याचवेळी बँकेचे सात लाखांचे कर्ज आणि हातउसने घेतलेले दोन लाख रुपये फेडणे अशक्य झाले. त्यांच्या मागे पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली
सोलापूर : दहिटणे येथील शेतकरी लक्ष्मण गवसाने (४५) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यांनी चिठ्ठीत लिहिले की, "अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या करत आहे. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी."
कारण काय?
दीड एकरवरील पिकाची पूर्ण हानी झाली. त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी, विज्ञान शाखेत शिकणारी मुलगी आणि अभियांत्रिकी शिकणारा मुलगा असे तीन अपत्ये मागे आहेत.