का पडतोय अवकाळी पाऊस?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, उत्तर-पश्चिम दिशेकडून सायक्लोनिक सर्क्युलेशन राज्यात प्रवेश करत आहे. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी या प्रणालीचा प्रभाव विशेषतः कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जाणवणार आहे. तसेच, म्यानमारजवळ तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेलं चक्रीवादळासारखं हवामान भारताच्या दिशेने सरकू शकतं का हे निरीक्षणाखाली आहे. दुसरा कमी दाबाचा क्षेत्र गुजरात किनाऱ्यालगत निर्माण झाला असून, या दोन्ही प्रणालींमुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढली आहे.
advertisement
पुढचे ४८ तास कसे असतील?
आज महाराष्ट्रातील काही भागांत हलका पाऊस पडणार आहे. मात्र, ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. कोकण किनारपट्टी, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती
कोकणात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मध्यम सरी येण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान २४ अंश राहील. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर भागात हलक्या सरींसह विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. पुण्यात कमाल तापमान २९ अंश, आणि किमान २१ अंश राहील.
सात दिवसांचा पावसाचा अंदाज
हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रित कुमार यांच्या माहितीनुसार, ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल. ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील आणि त्यानंतर हवामानात सुधारणा होईल.
या अवकाळी पावसामुळे दिवसाचं तापमान वाढलं असून थंडीचा प्रारंभ उशिरा होण्याची शक्यता आहे. दिवसा उकाडा आणि सायंकाळी कोसळणारा पाऊस अशा मिश्र हवामानामुळे नागरिक गोंधळात पडले आहेत.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
रब्बी हंगामाची सुरुवात होत असल्याने कांदा, गहू आणि हरभरा लागवडीच्या तयारीत शेतकरी आहेत. सध्या पाऊस असल्याने नांगरणी आणि पेरणी काही दिवस थांबवावी.जमिनीत ओलावा स्थिर झाल्यानंतरच लागवड करावी. बियाणे साठवताना ओलाव्यापासून जपावे.पिकांवर रोग व बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतात योग्य निचरा ठेवावा.
