हवामानाचा आढावा
उत्तर गुजरात आणि नैऋत्य राजस्थानमध्ये कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रीय आहे. ही प्रणाली दिसा गुजरातपासून ४० किमी पश्चिम, राधांपूरपासून ५० किमी ईशान्य तर भूजपासून २३० किमी पूर्वेकडे होती. यामुळे छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा शिवपूर, गुना, दामोह, माना, गोपालपूर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ३.१ ते ५.८ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती दिसत आहे.
advertisement
या पोषक हवामानामुळे रविवारी (ता. ६) सकाळपर्यंत २४ तासांत नाशिकच्या पेठ तालुक्यात सर्वाधिक १३० मिमी पावसाची नोंद झाली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी १०० मिमी पाऊस झाला. इतर भागात हलक्या सरी व ढगाळ वातावरण होते. दरम्यान, ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांक ३३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
आजचा अंदाज काय?
पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी आहे. तसेच, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या सरी आणि पावसाची उघडीपी कायम राहील.
येलो अलर्ट असलेले जिल्हे :
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
सध्या खरीप पिकं परीपक्वतेच्या अवस्थेमध्ये आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांनी पुढील काळजी घेणं आवश्यक आहे पिकांवर पडणारा पाऊस व आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोग (उदा. डाग, करपा, कुज) वाढू शकतात. यासाठी कार्बेन्डाझिम, मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी योग्य फवारणी करावी. पिकं वाकू नयेत म्हणून शेतात निचऱ्याची सोय करून ठेवावी.
कडधान्ये व सोयाबीनमध्ये अळ्या व पांढरी माशी नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट किंवा थायोमेथॉक्साम यासारखी कीटकनाशके फवारावीत. तुरी, उडीद यांसारख्या पिकांवर फुलोरा सुरू असल्यास मधमाशांचा अपाय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी पिकाच्या अवस्थेनुसार खत व्यवस्थापन करावे, जेणेकरून दाणे व शेंगा भरण्यास मदत होईल.