वादळी प्रणालीचा प्रभाव
आग्नेय पाकिस्तान, राजस्थान आणि कच्छ परिसरावर सक्रिय असलेल्या वादळी प्रणालीचा (डीप डिप्रेशन) प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवत आहे. ही प्रणाली हळूहळू कमी होत असली तरी कोटा, ओराई, सिधी, रांची, दिघा, ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे ओडिशा व आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यामुळे राज्यात वातावरण पावसाला पोषक राहिले आहे.
advertisement
कोठे किती पाऊस?
सोमवार (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत नाशिक जिल्ह्यातील ओझर खेडा आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे प्रत्येकी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागांत तुरळक सरी झाल्या. उर्वरित भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी पडत राहिल्या. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी तापमान ३३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा इशारा
आज (ता. ९) विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
पिकांची देखभाल : सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या पिकांवर पावसाच्या जोरदार सरींमुळे पानगळ किंवा कुज येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी निचरा व्यवस्थेची काळजी घ्यावी.
काढणी टाळा : आधीच तयार झालेल्या पिकांची काढणी घाईघाईत करू नये. पाऊस थांबल्यानंतरच काढणी करावी, अन्यथा उत्पादनाचे नुकसान होऊ शकते.
साठवणुकीची खबरदारी : धान्य घरात आणले असल्यास कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे.विजांच्या कडकडाटामुळे शेतातील मशिनरी व जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे.