सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निवजे गाव, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे गाव आता कार्बनमुक्त आणि धुरमुक्त गाव म्हणून ओळखले जाते. एकेकाळी येथे चुलींसाठी लाकडे जाळली जात होती. मात्र, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेच्या प्रयत्नांमुळे गावात गोबर गॅस प्रकल्पांना सुरुवात केली. त्यामुळे गाव धूरमुक्त झाले असून, निसर्गाचे संरक्षण साधले गेले आहे.
advertisement
गोबर गॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक शेण मिळवण्यासाठी गावाने दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. गावात आता दररोज 300 लिटर दूध संकलन होते, आणि वार्षिक टर्नओव्हर सुमारे एक कोटी रुपये आहे.
दुग्ध व्यवसायातून आर्थिक समृद्धी
गावातील युवकांनी हरियाणा येथून मुरा जातीच्या म्हशी आणल्या असून, दुग्ध व्यवसायाची व्याप्ती वाढवली आहे. गावातील शेतकरी आता चारा लागवड करीत असून, इतर गावांनाही चारा पुरवू लागले आहेत. गोवा आणि मुंबईतून परत आलेल्या तरुणांनी या व्यवसायात नवी ऊर्जा दिली आहे.
गोबर गॅसच्या फायद्यांनी महिलांना दिलासा
गोबर गॅस प्रकल्पांमुळे महिलांची जंगलात लाकडे आणण्यासाठी होणारी धावपळ थांबली आहे. याशिवाय गोबर गॅसवर स्वयंपाक करताना धूर होत नाही, त्यामुळे आरोग्य सुरक्षित राहते. गोबर गॅसच्या वापरामुळे जेवण कमी वेळात तयार होते, आणि महिलांच्या वेळेची बचत होते.
स्थानिक पातळीवर प्रयत्न
भविष्यात मुरा जातीच्या म्हशींची उपलब्धता हरियाणा ऐवजी जिल्ह्यातच होईल, असा प्रयत्न गावातील लोकांनी सुरू केला आहे. तसेच गावाने निसर्गाचे जतन करून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला आहे.