जालना: दिवस प्रत्येकाचेच बदलतात फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा असते. हेच जालना जिल्ह्यातील अत्यंत साधारण परिस्थिती असलेल्या एका शेतकऱ्याने दाखवून दिले. जालना जिल्ह्यातील उटवद गावच्या काशिनाथ बकाले या शेतकऱ्याने अनेक वर्ष दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केलं. आता त्यांच्याकडे 12 एकर शेत जमीन असून 3 एकर द्राक्ष बागेचे ते मालक आहेत. या द्राक्ष बागेतून त्यांना 9 ते 10 लाखांचा निव्वळ नफा होतोय. शेतकरी बकाले यांचा सालगडी ते द्राक्ष बागेचा मालक असा प्रवास लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
जालना जिल्ह्यातील उटवद हे एक छोटस गाव आहे. या गावात बहुतांश लोक शेती याच व्यवसायावर अवलंबून आहेत. काशिनाथ बकाले यांच्या घरची परिस्थिती अत्यंत साधारण होती. त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. आयुष्यातील महत्त्वाचा काळ त्यांनी इतरांच्या शेतात काम करण्यात घालवला. परंतु, मेहनत प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर आज त्यांच्याकडे 12 एकर शेत जमीन आहे. यापैकी 3 एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग असून या द्राक्ष बागेतून 12 ते 15 लाखांचे उत्पन्न त्यांना होणार आहे.
40 वर्ष शेतीनं शिकवलं आता एकरी 10 लाखांचा नफा, सांगलीच्या पिसाळ कुटुंबाची यशोगाथा!
प्रामाणिक कष्टाचं फळ
शेतकरी काशिनाथ बकाले यांनी एकेकाळी दुसऱ्याच्या शेतामध्ये शेळ्या मेंढ्या चारणे, नांगर धरणे, जमीन वखरणे अशी सगळी कामे त्यांनी केली. प्रसंगी मालकाची बोलणे ऐकली. परंतु आयुष्यभर प्रामाणिकपणे जीवन जगले. याचंच फलित म्हणून ही समृद्धी आल्याचं काशिनाथ बकाले सांगतात.
यंदा 10 लाखांचं निव्वळ उत्पन्न
बकाले यांना दोन मुले आहेत. यापैकी एक जण सौर ऊर्जेचे काम पाहतो. तर दुसरा शेती पाहतो. आमच्याकडे 2003 मध्ये ही द्राक्षबाग होती. मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे आम्ही त्यावर कुऱ्हाड चालवली. परंतु पुन्हा एकदा द्राक्ष बाग लावली. दोन-तीन वर्ष द्राक्ष बागेतून काहीही घडलं नाही. मात्र पूर्व अनुभवातून ती काढून न टाकता जगवली. याचंच फळ 2024 आणि यंदाच्या वर्षी मिळत आहे. यंदा 300 क्विंटल द्राक्षांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. तर याला 50 रुपये प्रति किलो असा जाग्यावरच दर मिळत असून यामधून 12 ते 13 लाखांचं उत्पन्न होऊन निव्वळ 9 ते 10 लाख हातात राहणार असल्याचे शेतकरी काशिनाथ बकाले यांचा धाकटा मुलगा ज्ञानेश्वर यांनी सांगितलं.