मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पादन अधिक असून त्यातच बाजारपेठेतील मागणी तुलनेने कमी झाल्याने दरात घट झाली आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी आंब्याची लागवड, त्याची निगा राखणे, तोडणी आणि साठवणूक हे सर्व कामे पार पाडून जेव्हा तो विक्रीसाठी पुढे जातो तेव्हा कृषी उत्पादन सेवा क्षेत्रात प्रवेश करते. मात्र त्याचा मुख्य लाभ व्यापाऱ्यांना जातो.
advertisement
शिक्षकाची कमाल! शेतीला दिली विज्ञानाची जोड, एकाच बागेत फुलवले 35 प्रकारचे आंबे
या पार्श्वभूमीवर कृषी अभ्यासक महादेव बिक्कड म्हणाले की, शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने केवळ घाऊक विक्री करण्यावर भर न देता किरकोळ विक्रीचा मार्ग स्वीकारावा. शेतकऱ्यांनी आपल्या आंब्याची थेट बाजारपेठेत विक्री केल्यास त्यांना अधिक नफा मिळू शकतो. यासाठी स्थानिक बाजार, हाट, प्रदर्शन, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स अशा माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे.
फक्त आंब्याची विक्री न करता, त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असेही बिक्कड यांचे मत आहे. आंब्यापासून लोणचे, आमसूल, जॅम, ज्यूस, स्क्वॅश, सॉस इत्यादी उत्पादने बनवून त्याची विक्री केल्यास मूल्यवर्धन होऊन उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. यामुळे फळांचे संपूर्णतः उपयोग करता येतो आणि वाया जाण्याची शक्यता देखील कमी होते.
शेवटी शेतकऱ्यांनी आंबा विक्रीत आत्मनिर्भर व्हावे आणि प्रक्रिया उद्योगाशी स्वतःला जोडून अधिक कमाई करण्याचे मार्ग शोधावे. शासनानेदेखील या दृष्टीने प्रशिक्षण, अनुदान व विपणनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावू शकेल. बाजारपेठेतील स्पर्धा वाढत असताना स्वतःचे ब्रँड निर्माण करणे हेही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.





