भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच मनरेगातून नाशिक जिल्ह्यात 3500 हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या दोन योजनांच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेत आंब्यांची सर्वाधिक लागवड करण्यात आल्याने कांदा अन् द्राक्षां साठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात आता आंबा पीकही घेतले जाणार आहे. कृषी विभागाने येणाऱ्या हंगामात या दोन योजनांद्वारे फळबाग लागवड वाढावी यासाठी आराखडा तयार केला आहे. प्रत्येक तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांना यासंदर्भात आढावा घेण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती वेटेकर यांनी दिली.
advertisement
Turmeric Farming: हळदीच्या उत्पादन वाढीसाठी योग्य खतमात्रा आवश्यक, कसं कराल व्यवस्थापन? Video
काय आहे फळबाग योजना ?
फळबाग योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी फळबागा लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणारी योजना आहे. या योजनेत सरकार शेतकऱ्यांना फळबागांसाठी लागवड खर्च, योग्य रोपे, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन यांसारखी मदत पुरवत असते.
फळबाग लागवड योजनेसाठी निकष
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना लाभ कोकण विभागासाठी कमाल 10.0 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कमाल 6.0 हेक्टर क्षेत्र मर्यादपर्यंत अनुज्ञेय आहे. अनुदान मर्यादा 100 टक्के असून राज्य शासनाची योजना आहे. वैयक्तिक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.
मनरेगा फळबाग योजना
जॉब कार्ड धारक असलेल्या अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड करता येते. तसेच, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेत, अनुदान तीन वर्षांमध्ये देय असते आणि ते थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते.
योजनेसाठी अर्ज कसा कराल ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा संबंधित कार्यालयात अर्ज करायचा आहे. योजनेनुसार, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये जमिनीचे दाखले, आधार कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच, योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत, शासनाकडून फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेत 100 टक्के अनुदान मिळत असल्याचे कृषी उपसंचालक महेश वेटेकर यांनी सांगितले.





