बक्षीस पत्र म्हणजे काय?
संपत्ती हस्तांतरण करताना भविष्यात वाद निर्माण होऊ नयेत म्हणून बक्षीस पत्र अधिकृत स्वरूपात नोंदणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः कुटुंबातील सदस्यांना किंवा निकटच्या व्यक्तींना प्रेमपूर्वक मालमत्ता देण्यासाठी बक्षीस पत्र वापरले जाते.
कायदेशीर प्रक्रियेनुसार बक्षीस पत्र हे "ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट" च्या कलम 122 आणि 126 अंतर्गत येते. ही प्रक्रिया जिवंत असतानाच पूर्ण केली जाते आणि मृत्युपत्राप्रमाणे मृत्यूनंतर अंमलबजावणी केली जात नाही.बक्षीस पत्र नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, जी मालमत्तेच्या प्रकारावर आणि स्थानावर अवलंबून असते.
advertisement
बक्षीस पत्राची नोंदणी आणि स्टॅम्प ड्युटी
बक्षीस पत्र अधिकृत करण्यासाठी स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी न केल्यास, बक्षीस पत्राला कायदेशीर वैधता मिळत नाही.
नोंदणी करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या?
मालमत्तेचे संपूर्ण तपशील असलेले दस्तऐवज बक्षीस देणारी (Donor) आणि स्वीकारणारी (Donee) दोन्ही व्यक्तींची उपस्थिती अनिवार्य. तसेच बक्षीस पत्रावर दोन विश्वसनीय साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक नियमांनुसार स्टॅम्प ड्युटी भरली गेली पाहिजे
स्टॅम्प ड्युटी किती लागते?
महाराष्ट्र स्टॅम्प अॅक्टच्या अनुच्छेद 34 नुसार, नवरा, बायको, भाऊ किंवा बहिण यांना बक्षीस पत्राद्वारे मिळकत हस्तांतर करताना मिळकतीच्या बाजारमूल्याच्या 3% स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.
जर मिळकत ही घर किंवा शेती संबंधित असेल आणि ती नवरा, बायको, मुलगा, मुलगी, नातू, नात अथवा मृत पावलेल्या मुलाच्या पत्नीला द्यायची असेल,तर केवळ 200 रु स्टॅम्प ड्युटी आकारली जाते.वरील नात्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही बक्षीस दिल्यास, नियमित खरेदीखताइतकी पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.
बक्षीस पत्र रद्द करता येते का?
सर्वसाधारणपणे बक्षीस पत्र रद्द करता येत नाही, कारण एकदा दिलेली संपत्ती परत मागता येत नाही. मात्र, काही परिस्थितींमध्ये ते रद्द करण्याची तरतूद आहे.
विशिष्ट अटी पूर्ण झाल्यास रद्द होऊ शकते?
जर बक्षीसपत्र तयार करताना त्यात "अशा प्रकारची एखादी घटना घडल्यास बक्षीस पत्र रद्द होईल" अशी अट नमूद केली असेल.
जर लाभार्थी मालमत्ता हस्तांतरानंतर गंभीर गैरवर्तन करत असेल, दात्यावर अन्याय करत असेल किंवा कराराचे उल्लंघन करत असेल, तर न्यायालयाच्या आदेशानुसार बक्षीस पत्र रद्द होऊ शकते.
