काळाच्या ओघात गावाचे नामकरण
स्थानिक अभ्यासक अरविंद भोंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवूरवाडा या गावाचे प्राचीन नाव देवालयपूर असे होते. काळाच्या ओघात नावात बदल होत जाऊन देवूरवाडा असे नामकरण झाले. गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मंदिरे असल्यामुळेच देवाचा वाडा असे हे नाव रूढ झाल्याचे सांगितले जाते.
या गावाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गावाच्या चारही बाजूंना विविध देवतांची मंदिरे आहेत. येथील अनेक मूर्ती स्वयंभू असल्याचा स्थानिकांचा विश्वास आहे. मंदिरांची वास्तू अत्यंत प्राचीन असून ती नेमकी कोणत्या कालखंडातील आहेत, याची ठोस नोंद उपलब्ध नाही. मात्र, त्यांच्या रचनेवरून आणि परंपरेवरून या मंदिरांचा इतिहास अतिशय जुना असल्याचे स्पष्ट होते.
advertisement
18 तीर्थांनी समृद्ध गाव
पायोष्णी ग्रंथाच्या आधारे देवूरवाडा येथे 18 पवित्र तीर्थांचे अस्तित्व असल्याचे सांगितले जाते. यामध्ये सोम तीर्थ हे प्रमुख असून ते गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पायोष्णी नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीच्या प्रवाहानुसार पुढे प्रवळ तीर्थ, अमृत तीर्थ, गरुड तीर्थ, लक्ष्मी तीर्थ, कपाल मोचन तीर्थ आणि वैद्यनाथ तीर्थ अशी विविध तीर्थे आढळतात.
बालकाशी तीर्थ लहान मुलांसाठी उपयुक्त
याशिवाय अग्नी तीर्थ, पिशाच्च तीर्थ, सोम गंगा, भानू तीर्थ आहेत. यातील भानू तीर्थ सध्या जमिनीखालून शोधून काढण्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जाते. तसेच वाघिका, शिविका आणि बालकाशी ही तीर्थे देखील आहेत. विशेषतः यातील बालकाशी लहान मुलांसाठी महत्त्वाचे मानले जातात. या ठिकाणी स्नान केल्यास आरोग्यदायी फायदे होतात, अशी श्रद्धा आहे. तसेच सिद्धेश्वर, स्वप्नेश्वर, चक्र तीर्थ आणि कजलेश्वर यांसारखी अन्य तीर्थेही या परिसरात आहेत. पायोष्णी नदीच्या प्रवाहानुसार ही सर्व तीर्थे एकामागून एक असल्याने या भागाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
धार्मिक परंपरा, पुरातन मंदिरे आणि पवित्र तीर्थांचा संगम असलेले देवूरवाडा हे गाव आजही भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे. या ठिकाणाचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जतन करण्याची गरज व्यक्त होत असून भविष्यात हे गाव पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठिकाण ठरू शकते.





