धाराशिव - यंदा शेती पिकांसाठी पोषक वातावरण नसल्याने कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच जुन्या कांद्याला चांगले बाजार भाव मिळत असले तरी देखील नवीन कांद्याचे बाजार भाव कोसळले आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या एक एकर कांद्याच्या पिकावर रोटावेटर फिरवला.
नारायण गवारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथील रहिवासी आहेत. त्यांनी खरीप हंगामासाठी एक एकर कांदा पिकाची पेरणी केली होती. कांद्याला बाजारभाव येईल या अपेक्षेने त्यांनी कांद्याची पेरणी केली होती. त्यानंतर फवारणी, खुरपणी त्याचबरोबर खत आणि पाणी व्यवस्थापन केले. कांद्याचे पिक काढणीच्या अवस्थेत आले असताना एक एकरातील कांद्याच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.
advertisement
नारायण गवारे यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणेच जपलेले हे कांद्याचे पीक मातीमोल झाले. त्यात बाजारात नवीन कांद्याचे बाजार भाव उतरले. त्यामुळे कांदा काढणीपेक्षा कांदा पिकावर त्यांनी रोटावेटर फिरवला आहे.
winter health tips : हिवाळ्यात हा एक ड्रायफ्रूट तुमच्यासाठी ठरेल वरदान, जाणून घ्या, संपूर्ण फायदे
कांद्याचे पीक आपल्याला चांगले उत्पादन देईल, अशी अपेक्षा गवारे यांना होती. मात्र, करपा रोगाने थैमान घातल्याने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. करप्याने कांद्याचे पीक शेतातच सडू लागले. त्यातच काढणीचा रोजगार 500 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचल्याने आणि नवीन कांद्याचे बाजार भाव 200 रुपयांपासून 800 रुपये ते 2 हजार रुपयांपर्यंत आल्याने गवारे यांनी कांद्याच्या शेतावर अक्षरक्ष: रोटावेटर फिरवला.