सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील आष्टा येथील तरुणाने आधुनिक पद्धतीने मिरचीचे उत्पादन घेतले आहे. यातून त्यांनी 25 गुंठे क्षेत्रात 4 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे तिखट मिरचीचा आर्थिक गोडवा चाखणारा 26 वर्षीय शेतकरी आहे. एग्रीकल्चरचे शिक्षण घेतलेला हा युवा शेतकरी वडील आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उत्तम शेती करतो आहे.
प्रणव शिंदे यांनी आपल्या 25 गुंठे शेतामध्ये हिरव्या मिरचीचे पीक घेतले. लागवड पूर्व मशागत करताना त्यांनी सहा ट्रॉली शेणखत घातले. उभी आडवी नांगरट करून बेड तयार करुन घेतले. सप्टेंबरमध्ये रोपवाटिकेतून 786 सेमीनस मिरचीची सुमारे चार हजार रोपे खरेदी केली. रोपांची लागवड पाच बाय सव्वा फुटावर केली. या मिरचीला ठिबकच्या साहाय्याने नियमित पाणी दिले. तसेच मिरचीवर बुरशी, करपा, अळी या रोगासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केली. मिरचीच्या व्यवस्थापनासाठी प्रणव यांनी रणजीत तळप यांचे मार्गदर्शन घेतले.
advertisement
कंपनीचा CEO काहीच नाही! शेतकऱ्याने शेतीतून कमावले 8 कोटी रुपये, प्रत्येकांनी पाहावी अशी रिअल स्टोरी
आधुनिक तंत्राचा वापर
रोप लागवडीनंतर वीस दिवसांनी काठी आणि तारेने मिरचीच्या झाडांना आधार दिला. तणावर नियंत्रण राहण्यासाठी मल्चिंग पेपर अंथरला आहे. तसेच पूर्णपणे ठिबकने पाणीपुरवठा केला आहे.
786 सेमीनस मिरची वाणास पसंती
786 सेमीनस या मिरचीच्या व्हरायटीस रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. इतर व्हरायटीच्या तुलनेत यावरती वातावरण बदलाचा कमी परिणाम होऊन चांगले उत्पादन मिळते. असा अनुभव सांगत प्रणव शिंदे यांनी 786 सेमीनस व्हरायटीस पसंती दिली आहे.
25 गुंठ्यात 12 टन उत्पादन
बदलत्या वातावरणात ही काटेकोर व्यवस्थापनामुळे प्रणव यांना मिरचीचे भरघोस उत्पादन घेता आले. लागवडीनंतर 45 व्या दिवशी मिरचीचे तोडे सुरू झाले. पहिल्या तोड्याला 200 किलोपासून सुरुवात होऊन अखेरच्या तोड्यापर्यंत त्यांनी तब्बल 12 टन उत्पादन मिळवले. मुंबई बाजारपेठेमध्ये समाधानकारक भाव मिळाल्याने प्रणव यांना 25 गुंठ्यातून 4 लाखांचा नफा झाला.
प्रयोगातून मिरची उत्पादनाचे तंत्र
प्रणव शिंदे यांनी 25 गुंठ्यामध्ये हिरव्या मिरचीच्या उत्पादनाचा प्रयोग केला होता. यामधून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. शिवाय मिरची पिकाचे तंत्रही गवसले आहे. 25 गुंठ्यांच्या प्लॉटनंतर त्यांनी दीड एकरात मिरचीचा प्लॉट तयार केला आहे. शिवाय 15 जानेवारी नंतर आणखी तीन एकर शेतामध्ये मिरचीचे पीक घेणार असल्याचे त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
भाजीपाला शेतीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते. भाजीपाला पिकातून तरुण शेतकरी फायदेशीर शेती करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.