सांगली: ऊस शेतीला फाटा देत कृष्णाकाठच्या बोरगाव येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी बापूबिरू वाटेगावकर फळ पिकांचे प्रयोग करत आहेत. आधुनिक शेतीची कास धरत त्यांनी आजवर द्राक्ष, पपई फळबागेतून यशस्वी उत्पादन घेतले आहे. नुकतेच त्यांनी 11 महिन्यात 11 लाख 55 हजारांचे जी-9 केळीचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. यंदाच्या अति पावसातही त्यांनी केळीबागेचे केलेले व्यवस्थापन जाणून घेऊया.
advertisement
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील शिवाजी वाटेगावकर आदर्श शेतकरी आहेत. त्यांनी 20 फेब्रुवारी 2023 रोजी जळगावमधून जी-9 केळीची रोपे आणली होती. एकरी एक हजार 400 रोपाप्रमाणे अडीच एकरासाठी 3 हजार 590 रोपे खरेदी केली.
अशी केली मशागत
सुरुवातीला शेतीची उभी-आडवी नांगरट केली. एकरी 6 आणि अडीच एकरात 15 ट्रॉली शेणखत घातले. यानंतर रान कुरटले, दोनवेळा रोटर मारून रान भुसभुशीत करून घेतले. यावर सहा फुटी गादी वाफा सरी सोडली. 5 फूट अंतरावर एक रोप दोन ओळीतील अंतर 6 फूट ठेवून रोपांची लावण केली. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केळीला वेळच्या-वेळी फवारण्या आणि खतांचे डोस दिले.
सांगलीच्या पिता-पुत्राची यशस्वी शेती, एकरी घेतलं तब्बल 158 टन उसाचे विक्रमी उत्पादन!
अति पावसामुळे उत्पादनास फटका
अडीच एकर क्षेत्रात 77 टन केळीचे उत्पादन निघाले आहे. उशिरा आलेला माल अजूनही शिल्लक आहे. उरलेला मालपक्व झाल्यानंतर उत्पादनाचा आकडा वाढणार आहे. सध्या हार्वेस्ट होऊन विक्री झालेल्या 77 टन जी-9 केळीस
सरासरी 15 रुपये प्रति किलो भाव मिळाला. चांगला भाव मिळाल्याने वाटेगावकर यांना 11 महिन्यात 11 लाख 55 हजारांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
अडीच एकरांसाठी केलेला खर्च
एक रोप 22 रुपये
3,590 = 78980
लावण प्रती रोप
2.50 x 3,590 = 8,975 रुपये
आळवणी
4,000 रुपये
औषध फवारणी
3,200 रुपये
मेहनत
एकरी 15 हजार रुपये
शेणखत (15 डम्पिंग)
62, 000 रुपये
रासायनिक खते
42, 000 रुपये
मशागतीसह सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करत त्यांनी उत्पादनाचा दर्जा वाढवला आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या अनुभवातून केळीचे योग्य व्यवस्थापन केले असून आता केळीचा खोडवा व्यवस्थापन देखील करत आहेत. कृष्णा काठावरील शेतकऱ्यांनी ऊसाला पर्याय म्हणून केळी उत्पादनाकडे वळायला हवे. यामुळे जमिनीचा पोत देखील चांगला राहण्यास मदत होत असल्याचे त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.