मुंबई : जम्मू आणि काश्मीरच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा हप्ता तातडीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. एवढेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीची मालकी नाही, परंतु प्रत्यक्ष शेती करतात, त्यांनाही राज्य सरकारच्या पडताळणी अहवालाच्या आधारे या योजनेचा लाभ देण्यात येईल.
advertisement
जम्मू-काश्मीरमधील मदत
कृषिमंत्री चौहान यांनी आरएस पुरा येथील बड्याल ब्राह्मण गावात पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, अनेक शेतकऱ्यांची पिके पुरामुळे वाहून गेली आहेत, शेतात ४-५ फूट वाळू साचली असून पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. त्यांनी स्पष्ट केले की, २ ऑगस्ट २०२५ रोजीच २० वा हप्ता जम्मू-काश्मीरमधील ८,७३,६७३ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून १८२.७१ कोटी रुपयांचा लाभ पोहोचविण्यात आला आहे.
पूरग्रस्त आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता २१ वा हप्ता आगाऊ मिळवून देण्यात येणार आहे, अशीही माहिती चौहान यांनी दिली. “आपत्ती निवारणात राजकारणाला स्थान नाही, गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हेच प्राधान्य आहे,” असे ते म्हणाले.
महाराष्ट्रालाही दिलासा मिळणार का?
महाराष्ट्रातही यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे लाखो हेक्टर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि विदर्भातील काही भागांत शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. भात, सोयाबीन, मका आणि भाजीपाला यासह अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील शेतकरी बांधवांमध्येही आता पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता वेळेपूर्वी मिळेल का? अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि पंजाबसाठी जाहीर केलेली तातडीची मदत शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. मात्र, आता उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील शेतकरीही लवकरात लवकर पीएम किसानचा पुढील हप्ता मिळावा अशी मागणी करीत आहेत. या रकमेने संपूर्ण नुकसान भरून निघणार नसले तरी ती शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.