धाराशिव : पूर्वी शेतकरी सरसकट पारंपरिक शेती करायचे. आता मात्र या शेतीला आधुनिकतेची जोड मिळू लागली आहे. तसंच फळं, फुलं आणि भाज्यांना दररोज मागणी असते, त्यामुळे फळबाग, फूलबाग आणि भाजीपाला उत्पादनातून उत्तम नफा मिळवता येतो. अगदी परदेशी फळांचीही आपल्या महाराष्ट्राच्या मातीत लागवड करून सोन्यासारखं उत्पन्न मिळवता येऊ शकतं, हे अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.
advertisement
बाजीराव दातखिळे हे धाराशिवच्या भूम तालुक्यातील पिंपळगावचे रहिवासी. पूर्वी ते पारंपरिक शेती करायचे, परंतु त्यातून फार उत्पन्न होत नव्हतं. अखेर त्यांनी एका एकरात ड्रॅगन फ्रुटची लागवड करायला सुरुवात केली. परदेशातलं हे फळ आता मराठवाड्यात चांगलं पिकू लागलंय. शिवाय त्याला बाजारात उत्तम भाव मिळत असल्यानं त्यातून उत्पन्नही बक्कळ मिळतं.
ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी त्यांना एकरी 4 लाख रुपयांचा खर्च आला. परंतु आज याच्या दुप्पट त्यांचं उत्पन्न आहे. बाजीराव दातखिळे यांच्या ड्रॅगन फ्रुट बागेला आता 18 महिने म्हणजेच दीड वर्षे पूर्ण झालंय. त्यातून मिळालेल्या पहिल्या उत्पादनातूनच बाजीराव लखपती झाले. त्यांना तब्बल 8 ते 9 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.
बाजीराव दातखिळे हे जेव्हा पारंपरिक शेती करायचे तेव्हा खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळच बसत नव्हता. त्यातच बाजारभावातील चढ-उतारामुळे एखाद्या पिकातून फायदा झाला तर एखादं पीक तोट्यात जायचं. त्यामुळे त्यांनी अखेर फळशेती करण्याचा निर्णय घेतला आणि ड्रॅगन फ्रुट निवडलं. यातून त्यांना मनासारखं आर्थिक उत्पन्न मिळत असल्यानं इतर शेतकऱ्यांनीही ड्रॅगन फ्रुटची लागवड करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.