सात महिन्यांची थकबाकी, 38 कोटींची रक्कम प्रलंबित
गोकुळ शुगर (धोत्री) आणि जय हिंद शुगर (आचेगाव) या कारखान्यांवर कारवाई केली जाणार आहे. गेल्या गळीत हंगामात या कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस गाळप केला. मात्र, जवळपास 38 कोटी रुपयांची रक्कम गेल्या सात महिन्यांपासून थकीत आहे. शेतकरी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली, मात्र कारखाना व्यवस्थापनाकडून ठोस प्रतिसाद मिळालाच नाही.
advertisement
तीन नोटिसांनंतरही कारखान्यांची टाळाटाळ
कारखान्यांना सलग तीन वेळा नोटिसा देऊनही थकबाकी अदा करण्यात आली नाही. यानंतर साखर आयुक्त कार्यालयाने आरआरसी (Revenue Recovery Certificate) अंतर्गत थेट कारवाईचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना अंतिम नोटीस दिली आणि मुदतही वाढवून दिली. मात्र, 31 जुलै ही अंतिम मुदत संपल्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली.
कारवाईची प्रक्रिया कशी पार पडली?
गुरुवारी, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्वतः दोन्ही कारखान्यांना भेट दिली. त्यांनी सांगितले की, कारखान्यांमध्ये चल मालमत्ता उपलब्ध नसल्यामुळे यंत्रसामग्री सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंत्रसामग्री सील केल्यानंतर तिच्या सुरक्षेची जबाबदारी कारखाना व्यवस्थापनाकडे सोपवण्यात आली आहे.
लेखी आश्वासनाचा भंग
याच महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन्ही कारखान्यांनी 31 जुलैपर्यंत सर्व थकबाकी अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती. मात्र, आश्वासनानंतरही एक रुपयाही दिला गेला नाही. त्यामुळे प्रशासनाला सक्त कारवाई करावी लागली.
पुढील टप्प्यात लिलावाची शक्यता
तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्पष्ट केले की, “कारखान्याची यंत्रसामग्री सील करण्यात आली आहे. आता कारखान्याच्या मालकीच्या जमिनीवरही बोजा चढवण्यात येईल. साखर आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार यंत्रसामग्री व जमिनीचे मूल्यांकन करून लिलाव प्रक्रिया हाती घेतली जाईल.”
शेतकऱ्यांची भावना
या कारवाईनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थोडा दिलासा आणि न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज थकले असून, या देणीच्या प्रतीक्षेत त्यांचे जीवन अडचणीत आले आहे.
