योजना काय आहे?
कृषी मंत्रालयाच्या या उपक्रमाअंतर्गत गावोगावी माती परीक्षणाची सेवा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे ही प्रयोगशाळा चालविण्याची संधी ग्रामीण युवकांसह SHG गट, RAWE कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित कृषी सखी, कृषी विद्यापीठातील विद्यार्थी आणि PACS शी जोडलेले उद्योजक यांना दिली जात आहे. प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी सरकारकडून 1.5 लाख रुपयांची एक-वेळची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.यातील 1 लाख रुपये उपकरणे खरेदी आणि वार्षिक देखभाल करारासाठी, तर 50,000 रुपये डिस्टिल्ड वॉटर, pH मीटर, EC मीटर, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स, काचसाहित्य आणि इतर सामग्रीसाठी दिले जातील. ही रक्कम लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने उपलब्ध होईल.
advertisement
योजनेचा उद्देश काय?
या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या गावातूनच परवडणारी आणि अचूक माती चाचणी सुविधा उपलब्ध करून देणे. यामुळे शेतकऱ्यांना शहरात किंवा दूरच्या प्रयोगशाळेत जाण्यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागणार नाही. कृषी तज्ञांचे मत आहे की माती अहवालावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने पिकांचे उत्पादन 20% ते 30% वाढू शकते आणि खर्चात लक्षणीय घट होते. या योजनेमुळे गावातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी मिळणार असून ग्रामीण पातळीवर शाश्वत व्यवसाय उभारण्याचा मार्ग मोकळा होत आहे.
नियम अटी काय?
VLSTL योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी ठेवण्यात आल्या आहेत. अर्जदारांकडे विज्ञान विषयासह दहावीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यासोबतच संगणक चालविण्याचे मूलभूत ज्ञान असावे. प्रयोगशाळेसाठी अर्जदाराकडे स्वतःची जागा असावी किंवा किमान चार वर्षांचा भाडेकरार असणे आवश्यक आहे. जागा निश्चित केल्यानंतर अर्जदाराने संबंधित कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.
जिल्हा कार्यकारी समितीकडून तपासणी झाल्यानंतर प्रस्ताव राज्य कार्यकारी समितीकडे पाठवला जाईल आणि एका महिन्याच्या आत मंजुरी मिळेल. मंजुरीनंतर राज्य सरकार एका आठवड्यात आर्थिक मदत जारी करेल, तर निधी मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत उपकरणे व साहित्य खरेदी करून पावत्या सादर करणे बंधनकारक असेल.
