जालना - खरीप हंगाम संपून शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. रब्बी हंगामातील हरभरा हे एक प्रमुख पीक आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हरभऱ्याचे उत्पन्न घेतले जाते. हरभरा पिकाच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते. त्याचबरोबर अनेक प्रचलित वाण हरभरा पिकाची बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्याचबरोबर काही सुधारित कृषी विज्ञान केंद्रांनी विकसित केलेली वाण देखील शेतकरी निवडू शकतात. याचबाबत लोकल18 चा खास रिपोर्ट.
advertisement
वाणाची योग्य निवड हरभरा पिकाचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचमुळे जालन्याच्या खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ श्रीकृष्ण सोनवणे यांनी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाच्या योग्य वाणाची निवड कशी करावी आणि हरभरा पिकाची कोणकोणती सुधारित वाणी उपलब्ध आहेत, याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, विजय हे हरभरा पिकाचे अतिशय जुने वाण आहे. या वाणाचा हरभऱ्याचा दाणा लहान आकाराचा असतो. त्याचबरोबर मध्यम ते भारी अशा जमिनीत हे वाण पेरले जाते. साधारणपणे 85 ते 90 दिवसांमध्ये पीक काढणीस येते.
तर फुले विक्रम हे वाण बागायती तसेच कोरडवाहू जमिनीसाठी उपयुक्त आहे. झाडाची वाढ ही उघड पद्धतीने होते हार्वेस्टरने या वाणाची पेरणी करावी लागते. तसेच फुले विक्रम प्रमाणेच फुले विक्रांत हे वाण आहे. मात्र, हे वाण पसरट वाढणारे आहे.
या वाणाचा दाणा मध्यम आकाराचा आहे. 105 ते 110 दिवसांमध्ये हे पीक काढणीस येते. कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीत हे वाण घेता येते.
फुले विश्वनाथ नावाचे महात्मा फुले विद्यापीठाचे अतिशय चांगले असे वाण आहे. या वाणाचा कालावधी 105 ते 110 दिवस आहे. कोरडवाहू किंवा मध्यम जमिनीसाठी हे वाण अतिशय योग्य आहे.
परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आकाश हे हरभऱ्याचे वाण देखील चांगले वाण आहे. कोरडवाहू जमिनीमध्ये 7 ते 8 क्विंटल एकरी उत्पन्न देणारा हे वाण आहे.
याचं बियाणं कोणत्याही दुकानात मिळत नाही, 'शिराळी दोडकी भात'बाबत ही माहिती अनेकांना माहिती नसेल
जॅकी 9218 ही एक सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये प्रचलित असलेलं वाहन आहे. या वाणाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते आणि याची उत्पादन क्षमता देखील चांगली आहे.
जॅकी 9218 वाणापेक्षाही सुधारित सुपर जाकी हे वाण आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे वाण आहे.
परभणी चना नावाचे एक नवीन वाण परभणी विद्यापीठाने विकसित केले आहे. हे वाण टपोऱ्या दाण्याचे असून त्याची उत्पादन क्षमताही चांगली आहे.
काबुली हरभरा बीडीएनजे 798 हे टपोरे दाण्याचे काबुली वाण आहे. काबुली वाण हे कमी कालावधीचे असतात. मात्र, यासाठी जमीन ही भारी असावी लागते. यामध्ये फुले, कृपा, विराट, पीडीकेबी टू आणि पीडीकेव्ही फोर अशी वाणदेखील आहेत.
काबुली हरभऱ्याला डॉलर चना असेदेखील म्हटले जाते. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी सुयोग्य वाणाची निवड करून आपल्या शेतातील हरभरा उत्पन्न वाढवावे, असे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथील शास्त्रज्ञ श्रीकृष्ण सोनवणे यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले.