वाटणीनंतर स्वतंत्र 7/12 उतारा काढण्याची प्रक्रिया
आपसातली सामंजस्याने वाटणी
सर्व भागधारकांनी आपसात जमीन कोणाला किती भाग मिळणार यावर एकमताने निर्णय घ्यावा. हा निर्णय लेखी स्वरूपात ‘वाटणी करारनामा’ (Partition Deed) म्हणून नोंदवला जातो. तो वकिलामार्फत तयार करून नोंदणी कार्यालयात रजिस्टर्ड करावा लागतो.
पोटहिस्स्यासाठी अर्ज
संबंधित तालुका कार्यालयातील महसूल विभाग किंवा ऑनलाइन महसूल पोर्टल (Mahabhulekh) वरून पोटहिस्सा नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. अर्जात वाटणी झालेल्या भागांचे तपशील, वाटणीचा करार, जुना 7/12 उतारा, जमीनधारकांचे आधार/पॅन कार्ड, रहिवासी पुरावा यांचा समावेश असतो.
advertisement
तलाठी व मंडळ अधिकारी यांची तपासणी
अर्ज सादर केल्यानंतर तलाठी संबंधित जमिनीची मोजणी करतो, तिथल्या सीमारेषा पाहतो आणि प्रत्यक्ष वाटणी झालेली आहे का हे खात्री करतो. त्यानंतर मंडळ अधिकारी अहवाल तयार करतो व तो तहसीलदारांकडे सादर करतो.
तहसीलदारांचा निर्णय व नोंदणी
तपासणी अहवाल व कागदपत्रांच्या आधारे तहसीलदार पोटहिस्सा मंजूर करतो. त्यानंतर महसूल नोंदींमध्ये प्रत्येक भागधारकाच्या नावाने स्वतंत्र 7/12 उतारा तयार केला जातो.
नवीन 7/12 उताऱ्याची मिळकत
मंजुरीनंतर संबंधित व्यक्ती Mahabhulekh किंवा e-Satbara वेबसाइटवरून आपला नवीन स्वतंत्र 7/12 उतारा पाहू व डाउनलोड करू शकतात. यावर फक्त त्यांच्याच नावाने मिळकतीची नोंद झालेली असते.
काही महत्त्वाच्या बाबी
वाटणी सर्व भागधारकांच्या संमतीने झालेली असावी. वादग्रस्त जमिनीवर पोटहिस्सा नोंद होत नाही. जमिनीवर जर कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद, बंधन किंवा कर्ज असले, तर ते आधी निकाली काढावे लागते. नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या जमिनींसाठी स्थानिक प्राधिकरणाची मान्यता लागते.
दरम्यान, जमिनीची वाटणी झाल्यानंतर स्वतंत्र 7/12 उतारा काढणे हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायदेशीर टप्पा आहे. हे न केल्यास भविष्यात मालकीसंबंधी वाद, व्यवहारातील अडथळे याचा सामना करावा लागतो. त्यामुळे जमिनीच्या वाटणीनंतर योग्य त्या कागदपत्रांसह तहसील कार्यालयात पोटहिस्स्यासाठी अर्ज करून वेगळा सातबारा उतारा मिळवणे सर्व जमिनीधारकांनी वेळेत करून घ्यावे.