मुंबई : हिवाळा हा पपई शेतीसाठी सर्वात अनुकूल हंगाम मानला जातो. या काळात रोगराई कमी असल्याने पपईची वाढ उत्तम होते आणि फळांची गुणवत्ता उच्च दर्जाची मिळते. त्यामुळे बाजारातही हिवाळ्यात पपईला चांगली मागणी असते. योग्य नियोजन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरल्यास एका एकरातून शेतकरी लाखोंची कमाई करू शकतात.
advertisement
खर्च किती येतो?
पपई लागवडीसाठी जमीन तयारी, नांगरट, मळणी, तणनियंत्रण आणि ठिबक सिंचनासाठी सुरुवातीला थोडा खर्च करावा लागतो. एकरी खर्चाचा अंदाज घेतला तर जमीन तयारीसाठी सुमारे 4 ते 6 हजार रुपये, तणनियंत्रणासाठी 3 हजार, तर प्रमाणित वाणांची रोपे जसे की रेड लेडी-786, तैवान किंवा थाई ताइवानी वाण यावर 12 ते 20 हजार रुपये खर्च येतो. ठिबक सिंचन बसवण्यासाठी 15 ते 18 हजार, खत, औषधे, रोगनियंत्रण आणि मजुरी मिळून साधारण 25 ते 30 हजार रुपये खर्च अपेक्षित असतो. अशा प्रकारे एकरी एकूण खर्च 60 ते 85 हजार रुपयांच्या दरम्यान होतो.
किती उत्पन्न मिळेल?
योग्य निगा आणि प्रमाणित वाणांची लागवड केल्यास पपईचे एकरी उत्पादन 35 ते 50 टनांपर्यंत मिळते. काही उच्च उत्पादक वाणांमध्ये उत्पादन 55 टनांपर्यंत देखील जाते. हिवाळ्यात पपईचा बाजारभावही इतर महिन्यांच्या तुलनेत जास्त असतो. दर प्रतिकिलो 8 ते 12 रुपये मिळाल्यास शेतकरी 3 ते 4.5 लाख रूपये उत्पन्न मिळवतात, तर दर 15 ते 20 रुपये असतील तर 5 ते 8 लाख रुपयांपर्यंत कमाई होते. जर मागणी वाढली आणि दर 25 ते 30 रुपयांपर्यंत गेले, तर एकरी उत्पन्न 9 ते 12 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांना मध्यम दरातही 4 ते 7 लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो, तर उच्च दरात हा नफा 8 ते 10 लाखांपर्यंत पोहोचतो.
हिवाळ्यात पपई शेती फायदेशीर मानली जाण्याचे मुख्य कारण म्हणजे या काळात रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो, फळांची वाहतूक सुरक्षित होते, तसेच बाजारातील मागणी सातत्याने वाढत असते. थंड हवामानामुळे फळांची गुणवत्ता टिकून राहते. त्यामुळे अनेक शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी पपईसारख्या फायद्याच्या पिकांकडे वळत आहेत.
नोव्हेंबर ते जानेवारी हा पपई लागवडीचा सर्वोत्तम काळ असून, योग्य नियोजन आणि बाजाराशी थेट संपर्क ठेवल्यास प्रत्येक शेतकरी सहजपणे लाखोंची कमाई करू शकतो. हिवाळ्यातील पपई शेती ही कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या आधुनिक शेती पद्धतींपैकी सर्वात फायदेशीर ठरत आहे.
