मुंबई : राज्यात पावसाची अनिश्चितता, भूजल पातळीतील घट आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांना पर्याय शोधत आहेत. अशा परिस्थितीत कमी पाण्यात, कमी खर्चात आणि जास्त नफा देणारे पीक म्हणून चिया (Chia) बियाण्यांची शेती शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आरोग्यदायी अन्नपदार्थ म्हणून चियाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असल्याने योग्य नियोजन केल्यास या पिकातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात.
advertisement
चिया हे ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले पीक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे फिटनेस आणि हेल्थ फूडकडे वाढलेल्या ओढीचा थेट फायदा चिया पिकाला होत आहे. चिया हे कोरडवाहू परिस्थितीत तग धरणारे पीक असून इतर अनेक पिकांच्या तुलनेत याला अत्यल्प पाण्याची गरज भासते. त्यामुळे दुष्काळग्रस्त किंवा कमी पाणी उपलब्ध असलेल्या भागातही हे पीक यशस्वीपणे घेता येते.
लागवडीसाठी योग्य हवामान व जमीन
चिया पिकासाठी मध्यम ते कोरडे हवामान उपयुक्त ठरते. चांगला निचरा असलेली हलकी ते मध्यम काळी जमीन या पिकासाठी योग्य मानली जाते. पाण्याचा अति साठा झाल्यास पीक खराब होऊ शकते, त्यामुळे निचरा व्यवस्था महत्त्वाची ठरते. खरीप हंगामात जून–जुलै किंवा रब्बीमध्ये ऑक्टोबर–नोव्हेंबर हा लागवडीसाठी योग्य कालावधी मानला जातो.
लागवड पद्धत व खर्च
चिया पिकासाठी एकरी सुमारे 2 ते 3 किलो बियाणे पुरेसे ठरते. पेरणीपूर्वी जमिनीची एक-दोन नांगरट करून भुसभुशीत मशागत करावी. पेरणी साधारणपणे ओळीमध्ये केली जाते. रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करावा लागतो, तर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनाचा दर्जा अधिक चांगला मिळतो. एकरी लागवड खर्च तुलनेने कमी असून साधारण 15 ते 20 हजार रुपयांत पीक तयार होते, असे तज्ज्ञ सांगतात.
कमी पाण्यातही चांगले उत्पादन
चिया पिकाला वारंवार पाण्याची गरज नसते. सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात आणि फुलोऱ्याच्या काळातच पाणी दिले तरी पीक तग धरते. त्यामुळे ठिबक किंवा मर्यादित सिंचनातही हे पीक सहज घेता येते. रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे औषधांचा खर्चही कमी येतो.
उत्पन्न आणि बाजारभाव
योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी 4 ते 6 क्विंटलपर्यंत चिया बियाण्याचे उत्पादन मिळू शकते. सध्या बाजारात चियाला प्रति किलो 300 ते 600 रुपये, तर काही ठिकाणी त्याहून अधिक दर मिळत आहे. यानुसार एकरी 1.5 ते 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यास निर्यातीसाठी अधिक दर मिळण्याची शक्यता असते.
