चीनची मोठी खेळी
या वर्षाच्या सुरुवातीला चीनने भारताला दुर्मिळ माती (Rare Earths) आणि काही अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवला होता, ज्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑक्टोबरपासून चीन विशेष खतांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी करत असल्याचा अहवाल समोर आला आहे. या निर्णयामुळे भारतातील खतांचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असून किमती वाढण्याचा धोका निर्माण होईल. थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार असल्याचे विद्राव्य खत उद्योग संघटना (SFIA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
तात्पुरता दिलासा, पण पुढे अडचण
सध्या चीनने काही काळासाठी विशेष खतांची निर्यात पुन्हा सुरू केली आहे. यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी हा फार काळ टिकणार नाही. SFIA चे अध्यक्ष राजीव चक्रवर्ती यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “हा फक्त तात्पुरता उपाय आहे. ऑक्टोबरपासून चीन निर्यातीचे दरवाजे पुन्हा बंद करणार आहे. हे पाऊल केवळ भारतापुरते मर्यादित न राहता जागतिक बाजारालाही फटका देईल.”
त्यांच्या मते, चीन कधीही पूर्णपणे पुरवठा थांबवत नाही, परंतु तपासणी वाढवून आणि शिपमेंटला विलंब करून निर्यात मर्यादित करतो. अशीच प्रक्रिया ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे.
भारत-चीन संबंधांवर परिणाम
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-चीन संबंध सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, चीनने घेतलेले निर्णय पुन्हा एकदा विश्वासघातासारखे वाटत आहेत. दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी खते आणि कच्च्या मालावरील निर्बंधांची मालिका भारतासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
देशातील पुरवठ्याची स्थिती
भारतातील विशेष खत उत्पादक कंपन्या सध्या पुढील महिन्याच्या गरजा भागवण्यासाठी झगडत आहेत. जागतिक सोर्सिंग कंपन्याही बंदी लागू होण्यापूर्वी पुरेसा साठा जमा करण्यासाठी धडपड करत आहेत. उद्योगाला आशा आहे की, सत्राच्या मध्यापर्यंत स्वदेशी उत्पादनाचा पुरवठा वाढेल, ज्यामुळे काही प्रमाणात अडचणी दूर होतील. तरीसुद्धा खतांच्या किमती वाढ थांबवणे कठीण दिसत आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी चिंता
भारतामध्ये कृषी क्षेत्रासाठी विशेष खते अत्यावश्यक मानली जातात. अशा वेळी चीनच्या निर्बंधांमुळे पुरवठ्यातील अडथळे निर्माण झाले तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. आधीच चारा, पशुखाद्य आणि इतर कृषी इनपुट्सचे दर वाढले आहेत. त्यात खतांच्या किमतींवर दबाव वाढल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणखी वाढेल.
थोडक्यात काय तर, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-चीन संबंध सुधारण्याच्या अपेक्षा असतानाच चीनकडून खत निर्यातीवर मर्यादा आणण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे भारतातील शेती आणि शेतकऱ्यांपुढे गंभीर आव्हान उभे राहू शकते. पुढील काही आठवडे या संकटाचा तोल कसा राखला जातो, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.