मुंबई : जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा मिळाली तर कोणताही आजार, अडचण किंवा परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ओडिशातील मानस रंजन दास यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले आहे. गंभीर आजाराशी झुंज देत, अत्यल्प उत्पन्नातून सुरुवात करून आज लाखोंची उलाढाल करणारा व्यवसाय उभारणारा मानस अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. कमी खर्चात मशरूम शेती करून त्यांनी केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही, तर शेकडो शेतकरी कुटुंबांना रोजगाराची दिशा दिली आहे.
advertisement
गंभीर आजार पण हार मानली नाही
ओडिशातील कटक जिल्ह्यातील मानस रंजन दास यांना अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा गंभीर आजार आहे. या आजारामुळे मानेच्या हालचालींवर मर्यादा येतात आणि शारीरिक कष्ट करणे अवघड होते. मात्र मानस यांनी या आजाराला आपली कमजोरी बनू दिली नाही. 2000 साली महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी धडपड सुरू केली. सुरुवातीला मोबाईल दुकानात सेल्समन म्हणून काम करताना त्यांना महिन्याला अवघे ६०० रुपये मिळत होते. त्यानंतर त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली, पण आर्थिक स्थैर्य काही मिळत नव्हते.
10 हजार रुपये महिन्याने नोकरी केली
2016 मध्ये ढेंकनाल येथील साई कृपा कॉलेजमध्ये त्यांना नोकरी मिळाली. येथे त्यांचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपये झाले. याच काळात ढेंकनाल जिल्ह्यातील मुक्तापसी गावातील काही यशस्वी मशरूम शेतकऱ्यांशी त्यांची ओळख झाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मानस यांनी मशरूम शेती करण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये त्यांनी अगदी छोट्या प्रमाणावर प्रायोगिक शेती सुरू केली.
खर्च कमी ठेवला
मानस यांच्या यशामागील सर्वात मोठे गमक म्हणजे खर्च कमी ठेवणे. इतर शेतकऱ्यांप्रमाणे महागड्या लोखंडी शेडऐवजी त्यांनी बांबूचे खांब आणि सावलीची जाळी वापरून शेत उभारले. यामुळे सुरुवातीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला. वर्षभर उत्पादन सुरू राहावे यासाठी त्यांनी योग्य नियोजन केले. मार्च ते ऑक्टोबर दरम्यान भाताच्या पेंढ्याचे मशरूम, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान ऑयस्टर मशरूमची लागवड ते करतात. परिणामी, त्यांना सातत्याने उत्पन्न मिळू लागले.
वर्षाला 24 लाखांची कमाई
आज त्यांच्या शेतातून दररोज सुमारे 30 किलो भाताच्या पेंढ्याचे मशरूम आणि दरमहा 70 ते 80 किलो ऑयस्टर मशरूमचे उत्पादन होते. यामुळे त्यांची सरासरी मासिक उलाढाल सुमारे 2 लाख रुपये असून वार्षिक उलाढाल 24 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
केवळ कच्चा माल विकण्यावर न थांबता मानस यांनी मूल्यवर्धनावर भर दिला. न विकलेले मशरूम वाळवून त्याची पावडर तयार केली जाते, जी किलोमागे हजार रुपयांपर्यंत विकली जाते. पत्नी रितांजली यांच्या मदतीने ते मशरूमचे लोणचे, कुकीज आणि इतर पदार्थही तयार करतात. प्रसिद्ध ‘बाली यात्रा’ मेळ्यातून त्यांना काही दिवसांतच दीड ते दोन लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते.
