सांगली जिल्ह्यातील पलूस हा द्राक्ष, ऊस उत्पादनातील आघाडीचा तालुका आहे. तालुक्यातील आंधळी येथील मयूर जगदाळे यांनी शिंपल्याची शेती आणि मोती उत्पादनाची वेगळी वाट पकडून घरच्या शेतीला वेगळा आयाम दिला आहे. त्यांचे वडील शिवाजी मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले असून ते घरची बारा एकर शेती पाहतात. इंजिनिअरिंगला असताना बैलाच्या साहाय्याने मशागत करणारे यंत्र तयार करून मयूर यांनी त्याचे पेटंटही मिळवले होते. त्यांनी काही काळ पुण्यात नोकरी केली.
advertisement
त्यावेळी मोती उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण होऊन इंटरनेट आणि अन्य स्रोतामधून त्याचा अभ्यास केला. सन 2012 मध्ये भुवनेश्वर (ओरिसा) येथील केंद्रशासित संशोधन केंद्राला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. सन 2018 मध्ये घरपरिसरातच आधुनिक तंत्रज्ञानासह व्यवसायाची उभारणी केली. आज पूर्णवेळ ते सॉफ्टवेअर इंजिनिअर पत्नी प्रियांका यांच्या साथीने शेती आणि उद्योगांमध्ये रमले आहेत. वडिलांसह आई रेखा यांचेही प्रोत्साहन, मार्गदर्शन मिळते.
Success Story : 30 गुंठ्यात केली शेती, 4 महिन्यात मिळालं दिड लाख उत्पन्न, असं काय केलं?
शिंपले शेतीतून मोती उत्पादन
प्रत्येकी 13 बाय 13 फूट आकाराचे दोन फिरते बायोफ्लॉक टँक आहेत. प्रति टँक 10 हजार लिटर पाण्याची आणि तीन हजार लिटर शिंपल्यांची क्षमता आहे.
टँकच्या अंतर्गत रचनेचे दोन प्रकार
पैकी ट्रे रचनेत प्रति टँक 375 ट्रे तर प्रति ट्रेमध्ये आठ शिंपले ठेवण्यात येतात. दुसरा प्रकार बॉक्स रचनेचा असून त्यामध्ये 30 बॉक्स आणि प्रति बॉक्समध्ये 40 ते 50 शिंपले आहेत.
शिंपला समूहात ठेवल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. तो अधिक चांगल्या प्रकारे वाढतो. त्यानुसार टँक रचनेचा प्रकार ठेवला आहे. प्रति शिंपल्यात दोन्ही बाजूला यानुसार तीन हजार शिंपल्यांमध्ये मिळून सहा हजार मोतीबीज ठेवण्यात येते. दीड वर्षाची एक बॅच. त्या कालावधीत 500 शिंपल्यांची मरतुक झाली तरी 2500 पर्यंत शिंपले जिवंत मिळतात. प्रति टँक सॉर्टिंग- ग्रेडिंग करून चार हजारांच्या आसपास दर्जेदार मोती उपलब्ध होतात.
शिंपले कोलकता येथून तर मोतीबीज इंडोनेशिया येथून व्यावसायिकांच्या माध्यमातून उपलब्ध होते. आठवड्यातून एकदा टँकमधील 25 टक्के पाणी सोडून देण्यात येते. त्याचा शेतीला वापर होतो. शिंपल्याचे खतमिश्रित हे पाणी पिकांना उपयोगी ठरते.
बाजारपेठ, विक्री
कॅल्शिअम कार्बोनेट किंवा मदर ऑफ पर्ल घटकाच्या वापरानुसार आणि ग्रेडनुसार दर मिळतो. मोत्यांना औषधनिर्मिती, आयुर्वेदिक, सौंदर्यप्रसाधने आणि अलंकार, ज्वेलरीसाठी मागणी आहे. विक्री हैदराबाद, राजस्थान तसेच परदेशात मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), हाँगकाँग, कतार येथे निर्यातदारांमार्फत होते. कारागिरांच्या मदतीने मोत्यांपासून आकर्षक ज्वेलरीही मयूर तयार करून देतात.
लाखोंची नोकरी करत चाकोरीबद्ध जगण्यात कधीच रस नसल्याने कोरोना लॉकडाऊनचा फायदा घेत मयूर गावाकडे राहिले. कुटुंबीयांचा पाठिंबा, नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याची आवड आणि अगदी कळत्या वयापासून शेतामध्येच वेगळं आणि उत्तम काहीतरी करण्याचे स्वप्न त्यांना आज लाखोंच्या नफ्यासह अभ्यासू शेतकरी आणि तज्ञ उद्योजक बनण्यापर्यंत घेऊन गेले आहे. शिंपल्यांच्या शेतीतून दर्जेदार मोती बनवणारे मयूर आज कित्येक नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरत आहेत.





