कोण पात्र आणि कोण अपात्र?
‘पीएम किसान’ योजनेनुसार, दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या कुटुंबातील फक्त एका सदस्याला योजनेचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच पती-पत्नी दोघांची स्वतंत्र शेतजमीन असली तरी त्यांना वेगवेगळा हप्ता मिळू शकत नाही. मात्र देशभरातील काही राज्यांत, विशेषतः महाराष्ट्रात, अशा अनेक उदाहरणांमध्ये पती-पत्नी दोघांनीही योजना अर्ज भरून स्वतंत्र लाभ घेतल्याचे आढळले आहे.
advertisement
दुहेरी लाभधारकांची ओळख सुरू
केंद्र शासनाने आता हा गोंधळ दूर करण्यासाठी नवीन तपास यंत्रणा सुरू केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकांतील माहितीचा वापर करून ‘पीएम किसान’ योजनेच्या डेटाशी पडताळणी केली जात आहे. शिधापत्रिकांमध्ये पती-पत्नीचे एकत्र नोंद असते, त्यामुळे कोणत्या कुटुंबाने दुहेरी लाभ घेतला आहे हे ओळखणे सोपे झाले आहे.
या प्रक्रियेद्वारे एकाच कुटुंबात दोन सदस्यांना मिळणारा हप्ता बंद करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कुटुंबातील एक सदस्याचा हप्ता थांबविला जाऊ शकतो आणि त्या व्यक्तीला राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’तूनही वगळण्यात येईल. कारण ‘नमो’ योजनेचे निकष ‘पीएम किसान’सारखेच आहेत.
निर्णय कधी होणार?
सध्या या संदर्भात केंद्र सरकारने कोणताही औपचारिक आदेश जारी केलेला नाही. मात्र, अंतर्गत पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने सांगितले, “राज्यात हजारो कुटुंबे दुहेरी लाभ घेत असावीत. मात्र, त्यांची नेमकी संख्या आणि पुढील कारवाईबाबत अद्याप केंद्राकडून स्पष्ट निर्देश मिळालेले नाहीत.”
काही माध्यमांमध्ये सुमारे ५० हजार कुटुंबांचे हप्ते थांबवले गेल्याच्या बातम्या समोर येत असल्या तरी, अधिकाऱ्यांच्या मते अद्याप कोणतीही आर्थिक मदत अधिकृतरीत्या रोखलेली नाही.
पुढील हप्ता व नवा आदेश
‘पीएम किसान’ योजनेचा २१ वा हप्ता पुढील काही दिवसांत वितरित होणार आहे. या हप्त्यापूर्वी केंद्र सरकारकडून नवे नियम आणि पडताळणी आदेश येऊ शकतात. त्यामुळे कुटुंबातील फक्त एका सदस्याला मदत मिळेल, अशी शक्यता अधिक आहे.
महाराष्ट्रात अधिक प्रमाण
राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी या दोन योजनांचा लाभ घेत आहेत. जर केंद्राने नव्या नियमांनुसार दुहेरी लाभधारकांचे नावे वगळली, तर हजारो कुटुंबांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
