रुपयामध्येही प्रचंड वाढ
रुपयांच्या मूल्यात मोजले तर, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताने १,२८८ कोटी रुपयांची अंडी निर्यात केली आहे. अंडी आणि त्यापासून तयार होणारी उत्पादने सर्वाधिक मागणी असलेली वस्तू ठरली आहेत. 'भारताची अंडी राजधानी' म्हणून ओळखले जाणारे नमक्कल (तामिळनाडू) हे देशातील सर्वात मोठे अंडी निर्यात केंद्र ठरले आहे.
यूएई बनली भारताची सर्वात मोठी बाजारपेठ
advertisement
पूर्वी भारतातील अंड्यांचा सर्वात मोठा खरेदीदार ओमान होता, मात्र यावेळी यूएईने आघाडी घेतली आहे. बिझनेस लाइनच्या अहवालानुसार, युएईने भारतातून अंड्यांची आयात मोठ्या प्रमाणात सुरू केली असून त्यांच्या बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ऑल इंडिया पोल्ट्री एक्सपोर्टर्स असोसिएशनचे सचिव वलसन परमेश्वरन म्हणाले, “यूएईने भारतीय अंड्यांच्या गुणवत्तेचे मोठे कौतुक केले आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्याचे फळ आता निर्यातीत दिसत आहे.”
भारतीय अंड्यांची मागणी का वाढली?
या वर्षी तुर्की आणि इराण या देशांना उत्पादन संकटांचा सामना करावा लागला. हे देश पूर्वी मध्यपूर्व बाजारपेठेतील प्रमुख पुरवठादार होते, पण उत्पादनातील घट झाल्याने भारताला ती पोकळी भरून काढण्याची संधी मिळाली. भारताने या वर्षी जून महिन्यात पहिल्यांदाच अमेरिकेला १ कोटी अंडी निर्यात करून विक्रम नोंदवला. जरी त्यानंतर अमेरिकेकडून नवीन ऑर्डर आलेली नसली, तरी या निर्यातीमुळे भारतीय उत्पादनावर जागतिक विश्वास वाढला आहे.
आशियाई देशांमधूनही वाढती मागणी
मध्य पूर्वेसोबतच आता जपान, इंडोनेशिया आणि सिंगापूर सारख्या आशियाई देशांकडूनही भारतीय अंड्यांना मागणी वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते जानेवारी २०२६ पर्यंत ही मागणी कायम राहील आणि या आर्थिक वर्षात पोल्ट्री निर्यातीचा आकडा आणखी उंचावेल.
मागील वर्षातील घट, आता ऐतिहासिक वाढ
२०२४-२५ मध्ये भारताच्या पोल्ट्री निर्यातीत सुमारे ९ टक्क्यांची घट झाली होती. निर्यातीचे मूल्य २०५ दशलक्ष डॉलर्सवरून १८५.९८ दशलक्ष डॉलर्सवर आले होते. पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे पालटली असून जागतिक उत्पादन घट आणि भारतीय अंड्यांच्या गुणवत्तेमुळे भारत पुन्हा बाजारपेठेच्या केंद्रस्थानी आला आहे.
राज्यनिहाय अंडी उत्पादन
अंडी उत्पादनात आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर (१७.८५%), त्यानंतर तामिळनाडू (१५.६४%), तेलंगणा (१२.८८%), पश्चिम बंगाल (११.३७%) आणि कर्नाटक (६.६३%) या राज्यांचा क्रम लागतो.
