जालना : उन्हाचा कडाका वाढताच मोसंबीच्या दरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. जालना शहरामध्ये प्रक्रिया उद्योग नसल्याने जालन्यातील मोसंबी उत्तर भारतामध्ये विक्रीस पाठवली जाते. डिसेंबर महिन्यामध्ये उत्तर भारतात कडाक्याची थंडी असल्याने जालन्यातील मोसंबीला अत्यल्प दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा नुकसान सहन करावं लागलं. आता मात्र तापमानात वाढ झाल्याने उत्तर भारतामध्ये मोसंबीला मागणी वाढली आहे. त्यामुळे जालन्यातील मोसंबीला चांगला दर मिळू लागला आहे. पाहुयात जालना मोसंबी बाजारात मोसंबी दराची स्थिती कशी आहे.
advertisement
जालना मोसंबी बाजारात सध्या 250 ते 300 टन मोसंबीची आवक दररोज होत आहे. या मोसंबीला 10 हजार रुपये प्रति टन ते 18 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. तर मृग ग्रस्त मोसंबीला 6 हजारपासून 12 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. आगामी काळामध्ये उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने उत्तर भारतातून जालन्यातील मोसंबीला मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोसंबीचे दर हे चढेच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान रविवारी 2 फेब्रुवारी रोजी मंगरूळ येथील एका शेतकऱ्याने आणलेल्या उच्च गुणवत्तेच्या मोसंबीला तब्बल 20 हजार 100 रुपये प्रति टन एवढा उच्चांकी दर मिळाला.
60 झाडांची लागवड, सेंद्रिय शेती पद्धतीचा फायदा, सोलापुरातील शेतकरी झाला लखपती!
या आठवड्यात जालना मोसंबी बाजारात मोसंबीचे भाव 2 ते 3 हजार रुपयांनी वाढले आहेत. उत्तर भारतामध्ये थंडी जास्त असल्याने मागील महिन्यामध्ये मोसंबीचे दर हे 8 हजारापासून 12 हजार रुपये प्रति टन असे होते. 12 ते 13 हजार रुपये प्रति टनाने विक्री होणारी मोसंबी आज रोजी 16 ते 17 हजार रुपये प्रति टन या दराने विक्री होत आहे.
जसजसं तापमान वाढत जाईल तसतशी मोसंबीचे दर हे वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबी तोडणीची घाई न करता ती उशिराने विक्री आणली तरी हरकत नाही. आज मोसंबीची 250 ते 300 टन एवढी आवक आहे. एवढी आवक दररोज राहील. मार्चच्या शेवटपर्यंत मृग बहाराची मोसंबी चालेल. उत्तर भारतातील दिल्ली, जयपूर, लखनऊ आणि पश्चिम बंगालमधील कलकत्ता या ठिकाणी मोसंबीला मागणी आहे, असं मोसंबी आडत्या असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनगाव यांनी सांगितलं.