सोयाबीनचे उत्पादन घटणार
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. मात्र, पावसाचा अतिरेक, निचऱ्याची अडचण आणि रोग-किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात जास्त टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्यास बाजारातील पुरवठा कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरांवर दिसून येईल.
दरवाढीची शक्यता
सध्या देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढत आहेत. सरासरी 4000 ते 4500 भाव आहे. मात्र, आगामी काळात उत्पादन घटल्याची चिन्हे दिसल्यास दर आणखी कडाडण्याची शक्यता आहे. बाजारात सोयाबीनचे दर मागणी-पुरवठ्याच्या समीकरणावर ठरतात. उत्पादन घटल्यामुळे शेतमालाची मागणी वाढेल आणि त्यामुळे भावात झपाट्याने वाढ होऊ शकते.
advertisement
आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव
सोयाबीन दर ठरवण्यात आंतरराष्ट्रीय बाजाराचाही महत्त्वाचा वाटा असतो. अमेरिकेत यंदा हवामानातील बदलामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. भारत हा सोयाबीन निर्यातीसाठी महत्त्वाचा देश ठरत असल्याने, उत्पादन घटूनही जागतिक मागणीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे. निर्यात वाढल्यास भारतीय शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळू शकतो.
दरम्यान, राज्यातील पावसाने सोयाबीनचे उत्पादन घटवले असले, तरी बाजारातील मागणी, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि निर्यात संधी यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा सोयाबीन पिकाला फटका बसला असला तरी शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा मिळू शकतो. आगामी काही आठवडे हा भाववाढीचा कल स्पष्ट होणार आहे.