नेमकं काय आहे प्रकरण?
धर्माबाद तालुक्यातील समराळा येथील बालाजी लक्ष्मण देवकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपली तक्रार धर्माबाद पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील श्रीकृष्ण भुसार दुकानातील व्यापारी लक्ष्मण कोंडिबा देवकर, सायन्ना गंगाराम इप्तेकर, पोतन्ना सायन्ना इप्तेकर, बालाजी सायन्ना इप्तेकर आणि संजय गंगाधर देवकर यांनी आपल्या मालाला बाजारपेठेपेक्षा जास्त दर देण्याचे गोड आश्वासन दिले होते.
advertisement
शेतकऱ्यांना थोडा जास्त नफा मिळेल, या आशेवर विश्वास ठेवून त्यांनी आपला मौल्यवान शेतीमाल या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी दिला. या काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, हरभरा आणि तूर खरेदी करून साठवला. काहींनी आपला सगळा कर्जाचा मालही या व्यापाऱ्यांकडे दिला होता.
मात्र, जेव्हा मालाच्या रकमेची मागणी शेतकऱ्यांनी केली, तेव्हा व्यापाऱ्यांनी सुरुवातीला थोडा वेळ मागितला. नंतर मात्र पैसे देण्यास टाळाटाळ सुरू झाली. फोन न उचलणे, दुकान बंद ठेवणे आणि भेटायला टाळाटाळ करणे असे प्रकार सातत्याने घडत राहिले. शेवटी शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे स्पष्टपणे जाणवले.
या प्रकरणात शेतकऱ्यांनी धर्माबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी पाचही व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यापाऱ्यांनी आणखी इतर अनेक शेतकऱ्यांना अशाच प्रकारे फसवले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास अधिक व्यापक पद्धतीने सुरू करण्यात आला आहे.
या फसवणुकीमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, काहींनी कर्ज काढून पेरणी व घरखर्च चालवला होता. त्यातच मिळकतीच्या पैशांची आशा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला. या व्यवहारात 2 कोटी 27 लाख रुपयांचा माल अडकून राहिल्याने शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.