सांगली : सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील शेतकरी कोरडवाहू शेती करतात. यंदाच्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांनी कांद्यासह मका देखील मोठ्या प्रमाणात पिकवला आहे. यापैकीच जतच्या माडग्याळ गावचे युवा शेतकरी पांडुरंग सावंत यांनी मक्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. आधुनिक पद्धतीने ठिबक सिंचनवर 5 गुंठ्यामध्ये तब्बल 13 क्विंटल मका पिकाचे उत्पादन घेतले आहे.
advertisement
पांडुरंग विठ्ठल सावंत हे जत तालुक्यातील माडग्याळ गावचे रहिवासी आहेत. त्यांनी कला शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच काही वर्ष परराज्यामध्ये खाजगी नोकरी केली आहे. परंतु शेतीची आणि मातीची ओढ असल्याने ते नोकरीत रमले नाहीत. सात वर्षांपूर्वी ते गावी परतले. आणि वडील मंडळी करत असलेली पारंपारिक कोरडवाहू शेती पाहिली.
हरभरा पिक येईल जोरात, नुकसान टाळण्यासाठी करा या उपाययोजना, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला
पावसाच्या जीवावर मका, शाळू, बाजरी यासारखी पिके घेऊन हाती फारसे काही मिळत नाही, हे त्यांनी जाणले. त्यानंतर काही संस्थांचे आणि कृषी अधिकाऱ्यांचे सावंत यांनी मार्गदर्शन घेतले. पारंपारिक शेती पद्धतीमध्ये बदल करत त्यांनी शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब केला. खडकाळ जमिनीवरती ठिबक सिंचनाचा वापर केला. रासायनिक खते आणि कीटकनाशकांना फाटा देत ते सेंद्रिय खते आणि कीटकनाशके वापरत आहेत. सावंत यांनी डाळिंब, ज्वारी, बाजरी, मका अशा विविध पिकांमध्ये प्रयोग केले आहेत. यामध्ये मका पिकातून आधुनिक पद्धतीने ठिबक सिंचनवर 5 गुंठ्यामध्ये तब्बल 13 क्विंटल उत्पादन घेतले आहे.
शेती विषयक अनेक प्रशिक्षणे घेतली आहेत. वेगवेगळी प्रशिक्षणे घेतल्यास ज्ञानामध्ये भर पडते. त्याच्या जोरावर योग्य नियोजन करत चांगली शेती पिकवता येत असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी भागात पाण्याचे अचूक नियोजन आणि मन लावून कष्ट केले तर शेतीतून चांगला नफा मिळवता येत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.